
बीडमधील सरपंच हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे हे आधीच अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुराव्यांचे बाड सादर करत मुंडेंवर कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकंदरच धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखीनच वाढतच चालल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्यांनी केलेल्या विविध घोटाळ्यांचे पुरावे अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन सादर केले. वर्षभराच्या कालावधीत या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का, याचा मुख्यमंत्र्यांनी गंभीर विचार करावा, असे म्हणत काहीही झालं तर आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे अशी मागणी अंजली दमनिया यांनी केली. एवढंच नव्हे तर भगवानगडाने मुंडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, मुंडेंच्या राजीनाम्यासाठी मागणी करावी अशी मागणीही दमानिया यांनी केली. लवकरच पुरावे घेऊन आपण भगवानगडावर जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
92 रुपयांची बाटली 220 रुपयांत विकत घेतली
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत दमानिया यांनी अनेक पुरावेही सादर केले. अंजली दमानिया यांनी तत्कालीन कृषी खात्यातील घोटाळ्याची कागदपत्रं प्रसारमाध्यमांसमोर मांडताना धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. नॅनो युरिया 184 पर लिटर दर आहे. म्हणजे 500 मिलिलीटरच्या बॉटलला 92 रुपये मिळतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती 220 रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात 92 रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी 19 लाख 68 हजार 408 बॉटल या 220० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
त्यांना मंत्रीपदावर ठेवावं का ?
6 लाख 18 हजार कॉटन स्टोरेज बॅग घेतल्या. आयसीएआय नावाची संघटना त्यांनी काही दिवसापूर्वी २० बॅगा 577 रुपयांना घेतल्या. पण मुंडेंनी टेंडरमधून 1250 रुपयांना त्या घेतल्या. 342 कोटीच्या टेंडरमध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले. मी ऑनलाइनच्या रेटने म्हणतेय. बल्कने पकडलं तर 20 टक्के अधिक आहे. इतके महान कृषी मंत्री आहेत. एकच वर्ष पदावर होते. एका वर्षात या व्यक्तीने अफाट पैसा खाल्ला असेल तर त्यांना मंत्रीपदावर ठेवण्याची गरज आहे का? असा सवाल दमानिया यांनी विचारला.
भगवान गडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा
हे सर्व पुरावे सादर करत आतात तरी मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीमाना घेतलाच पाहिजे अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच भगवान गडाने आता तरी त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा आता तरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी ही भगवान गडाला विनंती आहे, असेही दमानिया म्हणाल्या.