शिवसेनेच्या एबी फॉर्मचे भाजपकडून वाटप, महायुतीत काहीतरी शिजतंय? खळबळजनक ऑडिओ क्लिप समोर
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप नेत्यांकडून वाटप होत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. संपर्कप्रमुख राजन साळवी यांच्यासोबतचा संतापजनक ऑडिओ व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका या निवडणुका पार पडल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकांचे बिगूल वाजले आहे. येत्या ३ फेब्रुवारीला राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यातच धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे अधिकृत एबी फॉर्म भाजप नेत्यांकडून वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप खुद्द शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संपर्कप्रमुख राजन साळवी यांना थेट जाब विचारला आहे. विशेष म्हणजे या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या नगरपरिषद निवडणुकीतील गोंधळ शमतो न शमतो, तोच जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अविनाश खापे आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामधील संभाषणाने खळबळ उडवून दिली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा मल्हार पाटील हा शिवसेनेच्या उमेदवारांना एबी फॉर्म आणून देतोय, असा आरोप या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये कार्यकर्त्याची हतबलता आणि संताप स्पष्टपणे जाणवत आहे. दिवसभर आमच्यासोबत बैठका घेता आणि रात्री राणा पाटलांसोबत चर्चा करून त्यांचे सुपुत्र आम्हाला एबी फॉर्म वाटतात. आम्हाला आता शिवसैनिक म्हणवून घ्यायची लाज वाटायला लागली आहे,” अशा शब्दांत अविनाश खापे यांनी आपली खदखद व्यक्त केली. संपर्कप्रमुख म्हणून निर्णय घेण्याचे अधिकार राजन साळवींचे असताना भाजप हस्तक्षेप का करत आहे? असा सवाल विचारला जात आहे.
राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ
मी तानाजी सावंत यांचा वैयक्तिक कार्यकर्ता नाही, पण धाराशिवमध्ये शिवसेनेसाठी सावंत गरजेचे आहेत, असे म्हणत नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. या पक्षातील गोंधळामुळे निष्ठावंत कार्यकर्ते रडत असून राजकारण सोडून घरात बसण्याची वेळ आल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान धाराशिव हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र गेल्या काही महिन्यांत ही परिस्थिती का बदलली? असा संतप्त सवाल आता तळागाळातील शिवसैनिक विचारत आहेत. या वादाचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
