
Dhule Municipal Corporation Election : महानगरपालिका निवडणुकीमुळे राज्याती राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आज (30 डिसेंबर) हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. तर दुसरीकडे निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याने अनेक ठिकाणी संताप आणि उद्रेक पाहायला मिळाला. काही ठिकाणी आयारामांना थेट तिकीट देण्यात आल्याने मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घडामोडी सुरू असताना दुसरीकडे काही नेते शेवटच्या क्षणीदेखील पक्षांतर करताना पाहायला मिळाले. राजकीय सोय पाहून आजदेखील अनेक नेत्यांनी पक्षबदल केला. या सर्व घडामोडी घडत असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. बड्या नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या हंगामात धुळ्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रणजित भोसले यांच्या पत्नी उज्ज्वला भोसले या धुळ्यात प्रभाक क्रमांक 1 मधून भाजपातर्फे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच पत्नीला बळ पुरवण्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे.
भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तसेच शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यामुळे तिथे राजकीय खळबळ उडाली आहे. आता रणजित भोसले हे पत्नी उज्ज्वला भोसले यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेत. दुसरकीडे शरद पवार यांच्या पक्षाला मात्र ऐनवेळी मोठा धक्का बसला आहे. भोसले यांच्यामुळे पडलेला खड्डा आता शरद पवार यांचा पक्ष नेमका कसा भरून काढणार? तसेच निवडणुकीच्या विजयासाठी शरद पवार यांचा पक्ष नेमकी कोणती रणनीती आखणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.