साईंचा जन्म आमच्या गावातील, पाथरी, शिर्डी वादात धुपखेडातील ग्रामस्थांची उडी

साई बाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादात औरंगाबादच्या धुपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे.

साईंचा जन्म आमच्या गावातील, पाथरी, शिर्डी वादात धुपखेडातील ग्रामस्थांची उडी

औरंगाबाद : साई बाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेल्या वादात औरंगाबादच्या धुपखेडा येथील ग्रामस्थांनी उडी घेतली आहे (Sai Baba Birthplace Issue). साईबाबा यांचे प्रगटस्थान धुपखेडा (Dhupkheda) असून बाबा सर्वात आधी इथेच दिसले असून तिथला विकास करण्यासाठी निधी द्या, असा ठराव धुपखेडाच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला (Sai Baba Birthplace Issue).

साई बाबा यांच्या चरित्रात ज्या चांद भाई यांचा उल्लेख आहे. ते चांद भाई औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या धुपखेडा येथे पोलीस पाटील होते. त्यांनाच साईबाबा सर्वात आधी दिसले. बाबांनी त्यांना काही चमत्कार दाखवले. त्यानंतर चांद भाई यांनीच बाबांना धुपखेडा येथे आणले आणि इथून बाबा शिर्डीला गेले, असा दावा धुपखेड्याच्या ग्रामस्थांनी केला. धुपखेडा विकासाची मागणी आजची नसून ही मागणी खुपवर्षं जुनी असल्याचा दावा माजी आमदार संजय वाघचौरे यांनी केला.

साईबाबा धुपखेड्याच्या डोंगरात फिरत होते. त्यावेळी चांदभाई यांचा घोडा हरवला होता. तो घोडा साईबाबा यांनी शोधून दिला. त्यावेळी साईबाबा आणि चांदभाई यांची पहिली भेट झाली. चांदभाई यांनी त्यांना धुपखेड्यात आणलं. त्यावेळी जगाला साईबाबा यांची ओळख झाली.

धुपखेड्यात राहत असताना साईबाबा अनेकवेळा गायब व्हायचे. ते लिंबाच्या झाडावर जाऊन बसायचे. ज्या झाडावर बाबा बसायचे त्या झाडाचा पाला आजही कडू लागत नाही, असाही दावा ग्रामस्थ करतात. जवळपास तीन ते चार वर्षे साईबाबा धुपखेड्यात राहिले. त्याकाळात त्यांनी अनेक चमत्कार केले.

लोकांना त्यांनी चांगल वागायची शिकवण दिली. ज्या झाडावर ते बसायचे त्याच्या खालीच त्यांचं स्थान आजही पूजनीय आहे. तिथून ते शिर्डीला गेले आणि तिथे स्थाईक झाले. मात्र बाबांचे चरण पहिले धुपखेड्याला लाभले. ते राहत असलेल्या ठिकाणी आजही अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे पाथरी आणि शिर्डीसोबतच या स्थळाचा देखील विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

धुपखेडा येथे ग्रामसभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला असून, याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात आली आहे. “आमची मागणी जुनीच, कोणाला देऊ नका असं आमचं म्हणणं नाही, त्यांच्यासोबत साई प्रगट झालेल्या आमच्या या धार्मिक स्थळाला देखील विकास निधी देऊन भाविकांची सोय करा”, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असल्याची माहिती आमदार संजय वाघचौरे यांनी सांगितलं.