मी जिवंत नाही, मी देवाला सुट्टी मागितलीय… मृत झालेल्या आज्जीची पहिली प्रतिक्रिया, घऱी येताच दणक्यात वाढदिवस
नागपूरच्या रामटेक तालुक्यातील मृत्यूबाबत चारगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगाबाई सावजी साखरे या आज्जीबाईंचा मृत्यू झाला होता, मात्र ती पुन्हा जिवंत झाली आहे.

मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे की, एक दिवस आपलाही मृत्यू होणार आहे. मृत्यूबाबत नागपूरच्या रामटेक तालुक्यातील चारगावमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. गंगाबाई सावजी साखरे या आज्जीच्या मरणाची बातमी नातेवाईकांमध्ये वाऱ्यासारखी पसरली, अंत्यविधीची तयारीही झाली. प्रेत समजून आज्जीच्या नाकात कापसाचे बोळे टाकले, पाय बांधले. सरणाकडे घेऊन जाणार तेवढ्यात आज्जीने पायाचे बोटं हलवावे. त्यावेळी आज्जी जिवंत असल्याचं नातेवाईकांना कळलं. त्यानंतर अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी नंतर दुसऱ्या दिवशी आज्जीचा 103 वा वाढदिवस साजरा केला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
103 वर्षांच्या आज्जीला जीवनदान मिळालं
रामटेक तालुक्यातील चारगावच्या गंगाबाई सावजी साखरे या 103 वर्षांच्या आज्जीला जीवनदान मिळालं आहे. गंगाबाई साखरे रामटेकमध्ये मुलीकडे राहतात. 12 जानेवारीला सायंकाळी त्यांची हालचाल थांबली त्यामुळे घरच्यांनी आज्जीला मृत समजले. नातेवाईकांना फोन सुरु झाले, अंत्यविधीची तयारी झाली. आज्जीच्या नाकात कापसाचे बोळे टाकले आणि पाय बांधले… मात्र तेवढ्यात आज्जीच्या पायाच्या बोटांची हालचाल सुरु झाली आणि नातेवाईकांना आश्चर्य वाटलं.
दुसऱ्या दिवशी आज्जीचा वाढदिवस साजरा केला
आज्जीच्या बोटांच्या हालचाली पाहून, नाकातला कापूस काढला. आज्जी जीवंत आहे यावर नातेवाईकांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर अंत्यविधीची तयारी रद्द करण्यात आली. 13 जानेवारीला गंगाबाई सावजी साखरे यांचा वाढदिवस असतो, त्यामुळे अत्यवीधीसाठी आलेल्या नातेवाईकांनी दुसऱ्या दिवशी आज्जीचा वाढदिवस साजरा केला. यावेळी नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
आज्जी काय म्हणाल्या?
या घटनेनंतर गंगाबाई सावजी साखरे यांच्या तोंडून, ‘मी जिवंत नाही… मला घेऊन जा… ॲाटोवाल्याला 50 रुपये द्या… मी देवाला सुट्टी मागीतली… असे शब्द ऐकायला मिळाले. पण आज्जीच्या मरणाच्या वृत्ताने दुःखात असलेल्या नातेवाईकांनी मोठ्या आनंदात केक कापून आज्जीचा 103 वाढदिवस साजरा केला. दरम्यान, या घटनेमुळे नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ही घटना आता परिसरात वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. त्यामुळे लोकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.