काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा ४० वर्षांचा प्रवास थांबणार, अजित पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सोहळ्यापूर्वीच भाजपला दिला इशारा

ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील त्यांना चहा पाण्याला बोलणार आहे. फुंडकर यांच्यासोबत जुळवून घेऊ. परंतु त्यांनी जर हेकेखोरपणा दाखवला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

काँग्रेसच्या या बड्या नेत्याचा ४० वर्षांचा प्रवास थांबणार, अजित पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश, सोहळ्यापूर्वीच भाजपला दिला इशारा
दिलीपकुमार सानंदा
| Updated on: Jun 12, 2025 | 12:47 PM

काँग्रेससोबत 40 वर्षांपासून असणाऱ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसला विदर्भात फटका बसणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदार संघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गुरुवारी दाखल होणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते दाखल होणार आहे. त्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वात आज खामगावमध्ये संकल्प मेळावा घेण्यात आला आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा म्हणाले, माझा काँग्रेसमधील 40 वर्षांचा प्रवास आज थांबणार आहे. मागील काळात काँग्रेसने मला भरभरून दिले. मी सांगेन ती पूर्व दिशा होती. स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मोठा निधी मिळाला. काँग्रेसची जी विचारसरणी आहे तीच अजितदादांची आहे. माझे कार्यकर्ते सत्तेत जावे, त्यांची कामे व्हावी, यासाठी आज दादांच्या राष्ट्रवादीत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश करत आहे. आज विलासराव असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती. काँग्रेसचे राज्य महाराष्ट्रामध्ये असते.

तर भाजपला जशाच तसे उत्तर

दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले की, अजित पवार यांनी सांगितले पंचायत समितीच्या निवडणुका महायुतीत निवडणुका लढायच्या आहेत. मात्र स्थानिक मंत्री, आमदार यांनी सन्मानपूर्वक जागा दिल्या तर सोबत लढू अन्यथा स्वबळावर लढू. आजच्या कार्यक्रमाचे भाजप नेते नाही. कारण हा भाजपचा कार्यक्रम नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील त्यांना चहा पाण्याला बोलणार आहे. फुंडकर यांच्यासोबत जुळवून घेऊ. परंतु त्यांनी जर हेकेखोरपणा दाखवला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ.

हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत सानंदा यांनी सांगितले, ज्यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले, त्या कम्पूच्या हातात सूत्र दिली आहे. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये नाराज होतो. त्यांनी माझी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण माझा निर्णय ठाम होता. आता अजित पवार यांची राष्ट्रवादी बुलढाणा, अकोला, वाशीमसह विदर्भात वाढविणे हा माझा संकल्प आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा शंभर टक्के फडकणार आहे. आम्ही सर्व शक्तिनिशी लढू आणि जिंकून दाखवू, असा विश्वास सानंदा यांनी व्यक्त केला.