दीडशे वर्षांच्या इतिहासात नाशिकचा उज्ज्वल भविष्यकाळ; पण काळासोबत बदलावे लागेल, मान्यवरांचे आवाहन

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: मनोज कुलकर्णी

Updated on: Dec 06, 2021 | 9:43 AM

नाशिकला अधिक समृद्ध आणि समर्थ बनवण्याची क्षमता वर्तमान आणि येणाऱ्या पिढीला जपावी आणि विकसित करावी लागेल. दीडशे वर्षांच्या इतिहासात आहे, उद्याच्या नाशिकचा उज्वल भविष्यकाळ असा सूर साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला.

दीडशे वर्षांच्या इतिहासात नाशिकचा उज्ज्वल भविष्यकाळ; पण काळासोबत बदलावे लागेल, मान्यवरांचे आवाहन
साहित्य संमेलनात नाशिक जिल्ह्याच्या विकासावर परिसंवाद रंगला.

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः नाशिक जिल्ह्याला समृद्ध आणि समर्थ असा वारसा लाभला आहे. गोदावरीच्या काठाकाठाने समृद्ध झालेल्या या नगरीच्या अवती-भोवती आदिवासी संस्कृती आणि समाज जीवनाची रुपेरी कडा लाभली आहे. गोदावरीच्या खळाळत्या प्रवाहाप्रमाणे इथल्या संगीताने जीवनाला अधिक मंत्रमुग्ध केले आहे. तर उद्योग इथला मानबिंदू असून बँकांच्या सहकारातून इथले अर्थचक्र गतिमान होताना इथल्या शेती संस्कृतीने हरितक्रांतीचा झेंडा अटकेपार फडकवला आहे. पर्यावरण आणि पर्यटन येथे हातात हात घालून नांदत आहेत. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर नाशिकला अधिक समृद्ध आणि समर्थ बनवण्याची क्षमता वर्तमान आणि येणाऱ्या पिढीला जपावी आणि विकसित करावी लागेल. दीडशे वर्षांच्या इतिहासात आहे, उद्याच्या नाशिकचा उज्वल भविष्यकाळ असा सूर साहित्य संमेलनाच्या परिसंवादात उमटला.

94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात आज आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिक जिल्ह्याची निर्मिती-151 वर्षातील वाटचाल, विकास आणि संकल्प’ या परिसंवादात जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी वरिष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे, शेखर गायकवाड, मोहन कुलकर्णी, रमेश पडवळ, डॉ. कैलास कमोद, प्रमोद गायकवाड, अश्विनी दसककर-भार्गवे, सुधीर मुतालिक, विश्वास ठाकुर, विलास शिंदे, किरण चव्हाण, मोहन कुलकर्णी, दत्ता भालेराव, विनायक रानडे यांनी या परिसंवादात यावेळी सहभाग घेतला होता. या परिसंवादाचे समन्वयन व संयोजन उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी नितीन मुंढावरे यांनी केले.

नाशिकचा वारसा

परिसंवादात रमेश पडवळ यांनी नाशिकचा वारसा या विषयाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील भक्ती आणि शक्ती स्थळांची माहिती दिली. यानंतर गोदावरीकाठी जिल्ह्याचा विकास कसा झाला त्याचप्रमाणे जिल्ह्यात असणारे प्राचीन मंदिरांची वैशिष्ट्ये डॉ. कैलास कमोद यांनी आपल्या गोदाघाटावरील नाशिक या विषयात सांगितली. तसेच आदिवासी बांधवांचा स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींचा इतिहास प्रमोद गायकवाड यांनी आदिवासी भागातील सामाजिक चळवळ या विषयांतर्गत परिसंवादात सादर केला.

सहकारी बँकींग

साहित्यातील शब्दांना संगिताची साथ मिळाल्यास अनमोल कलाकृतीची निर्मिती होते. यानुसारच विष्णू दिगंबर पळुसकर यांच्यापासून जिल्ह्यात सुरू झालेला संगीताचा वारसा आजही विविध पैलुंनी विकसित करून जपला जात आहे, असे अश्विनी दसककर यांनी सांगितले. यासोबतच नाशिक जिल्ह्यात सुरूवातीला अनेक अडीअडचणींचा सामना करून आज उद्योग नगरीने दीपस्तंभासारखे स्थान निर्माण केले आहे, असे सुधीर मुतालिक यांनी यावेळी सांगितले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्याचे काम जिल्ह्यात नागरी सहकारी बँक करत असल्याचे सांगत विश्वास ठाकुर यांनी नागरी सहकारी बँकींग क्षेत्रातील जिल्ह्यातील स्थितीची माहिती दिली.

मृत जंगलांना जीवन

नाशिक जिल्ह्यातील कृषी क्षेत्राने द्राक्ष, कांदा या मुख्य पीकांसोबतच भाजीपाला उत्पादनातून जागतिक स्तरावर आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आणि यातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था भक्कम करण्याची आणि ग्रामीण भागाला दिशा देण्याचे महत्वाचे योगदान दिले आहे, असे सादरीकरण विलास शिंदे यांनी कृषी विषयावर केले. पर्यावरण या विषयाची मांडणी करतांना पर्यावरणाचा शाश्वत विकास करण्यासाठी पर्यावरणाला पोषक अशी जीवनशैली नाशिककरांनी अंमलात आणीवी, असे विचार किरण चव्हाण व मोहन कुलकर्णी यांनी परिसंवादात मांडले. नाशिक देवराई प्रकल्पाची माहिती शेखर गायकवाड यांनी परिसंवादात देतांना ते म्हणाले की, देवराई वनराई प्रकल्पामार्फत मृत जंगलांना जीवन देण्याचे काम करण्यात येत आहे. लोकांना जंगलातील वेगवेगळया घटकांची माहिती व्हावी या उद्देशाने असे उपक्रम जिल्ह्यात राबविणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रंथालयाचे संग्रहालय नको

ग्रंथालयाचे संग्रहालय होवू नये, यासाठी वाचनाची चळवळ वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सार्वजनिक वाचनालाचे विनायक रानडे यांनी परिसंवादात सांगितले. इतिहासाचा मागोवा घेत जिल्ह्याच्या विकासासाठी नाशिककरांनी काळानुरूप बदलणे आवश्यक आहे, असे मत माजी वरिष्ठ सनदी अधिकारी महेश झगडे यांनी परिसंवादात मांडले. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.

इतर बातम्याः

Girish Kuber| समाजाचे अवैचारिकरण, प्रगल्भतेची आस आहे का, कुबेरांचा सवाल; पत्रकारिता सत्य विसरली, डोळेंचे खडे बोल!

Nashik| साहित्य संमेलनात पुस्तकांचे मार्केट डाऊन, ऑनलाईनला तेजी; 5 वर्षांत खरेच वेगळे चित्र असेल?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI