Disha Salian case : दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लिनचीट… संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, फडणवीस, शिंदे आणि राणेंनी…
दिशा सालियन प्रकरणात एसआयटीने आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट दिल्यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्यावर निशाणा साधत माफी मागण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी या प्रकरणात भाजप नेत्यांनी आदित्य ठाकरेंना बदनाम केल्याचा आरोप केला आहे आणि नैतिकतेच्या आधारे माफीची मागणी केली आहे.

बॉलिवूडमधील दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिचं मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. तिची हत्या झाल्याचा व तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला किंवा तिची हत्या झाली हे कोणत्याही वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही. दिशाच्या मृत्यूप्रकरणात घातपात नसल्याचं प्रतिज्ञापत्र एसआयटीने जारी केलं असून याप्रकरणातील आरोप निराधार असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीन चीट मिळाली आहे. याच मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
काय म्हणाले राऊत ?
आता देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली पाहिजे. दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा जर क्लिनचीटचा रिपोर्ट आला आहे. ही आत्महत्याच आहे. राणेंचा मुलगा आहे ना. तो एवढा एवढा, त्याला टिल्या म्हणतात. तो मंत्री आहे. तो, देवेंद्र फडणवीस, भाजपचे मंत्री आहेत, तसेच एकनाथ शिंदे आहेत या लोकांनी शिवसेनेची आणि आदित्य ठाकरेंची माफी मागितली पाहिजे. एका तरुण नेत्याला त्यांनी घेरलं,बदनाम केलं पण आम्ही मागे हटलो नाही. त्यामुळे आता तुमच्याकडे थोडीशी देखील नैतिकता असेल तर आदित्य ठाकरेंची माफी मागा, अशी मागणी राऊतांनी केली.
राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे..
हे पोलीस आमचे नाही. ही एसआयटी आमची नाही. तुम्हीच स्थापन केली. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगलं काम केलं. त्यांचं नेतृत्व खच्ची करण्याचं काम केलं. सत्य समोर आलं. आता काय करणार. सर्वात आधी फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे, असं राऊत म्हणाले. नेपाळ्यासारखा बडबडणाऱ्या राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागितली पाहिजे. ज्यांनी आऱोप केले आणि बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे. तुम्ही एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करता, बदनाम करता, यंत्रणेचा आणि सत्तेचा गैरवापर करता तुम्ही. पण लक्षात ठेवा तुमच्यावर एक दिवस डाव उलटला जाईल. तेव्हा आम्ही पाहू असा इशाराही राऊतांनी दिला.
दिशा सालियन प्रकरण काय ?
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर असलेली दिशा सालियान हिने 8 जून 2020 रोजी मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून उडी मारून कथितरित्या आयुष्य संपवलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या मानून तपास सुरू केला. दिशाच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले होते. मात्र, नंतर त्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. आता त्यांनी पुन्हा चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली आहे. दरम्यान या प्रकरणात झालेले आरोप खोटे आहेत, निराधार आहेत असे सांगत ही याचिका फेटाळून लावावेत अशी हस्तक्षेप याचिका शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी केली आहे.
