भर सभागृहात खडसे-महाजन यांच्यात अभूतपूर्व खडाजंगी; वाळू माफिया, खंडणी ते PIचा मृत्यू, वाचा A टू Z
"आमच्या जळगाव जिल्ह्यात रेतीचा स्मगलर कोण आहे? एक सदरे नावाचा पीआय, त्याने स्वत:ने आत्महत्या केली. कुणामुळे केली? त्यावेळेला कोण खंडणी मागत होतं? ते नाव समोर आलेलं आहे. त्याच्या पत्नीकडे जावून पैशांचं आमिष दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आमिष दाखवण्यात आलं. त्यामुळे त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी लपवण्यात आली. हे कुणी केलं?", असा सवाल गिरीश महाजन यांनी सभागृहात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एकनाथ खडसे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यात आज विधान परिषदेत जोरदार खडाजंगी बघायला मिळाली. एकनाथ खडसे यांनी राज्यातील गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरुन प्रश्न उपस्थित केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं. यानंतर एकनाथ खडसे यांनी वाळू माफियांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार निशाणा साधला. या दरम्यान मंत्री गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांचं भाषण सुरु असताना बोलू लागले. त्यांनी वाळू माफियांच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. गिरीश महाजन यांनी सदरे नावाच्या पीआयने आत्महत्या कुणामुळे केली? हे स्पष्ट करण्याची मागणी केली. त्यांनी वाळू माफिया, अवैध उत्खनन केल्याचा खडसेवर गंभीर आरोप केला. यामुळेच खडसे यांच्या कुटुंबातील लोकांना 3 वर्ष जेलमध्ये राहावं लागल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला. यावेळी खडसेंकडून देखील जळगाव जिल्ह्यात वाळू उपसा, आणि अवैध धंदे महाजन यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी सभागृहात दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये अभूतपूर्व असा शाब्दिक राडा बघायला मिळाला. अखेर सभापती राम शिंदे यांना या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली. पण वाद वाढतच गेला. अखेर सभापतींनी चर्चा स्थगित केली.
सभागृहात काय-काय घडलं? वाचा थोडक्यात
गिरीश महाजन : सन्मानीय सदस्य रेतीबद्दल काहीतरी बोलत होते, आमच्या जळगाव जिल्ह्यात रेतीचा स्मगलर कोण आहे? एक सदरे नावाचा पीआय, त्याने स्वत:ने आत्महत्या केली. कुणामुळे केली? त्यावेळेला कोण खंडणी मागत होतं? ते नाव समोर आलेलं आहे. त्याच्या पत्नीकडे जावून पैशांचं आमिष दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. त्यांना काहीतरी आमिष दाखवण्यात आलं. त्यामुळे त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी लपवण्यात आली. हे कुणी केलं? कुणाचं नाव समोर आलं होतं? आमच्याकडे रेतीचा स्मगलर कोण आहे? इकडेतिकडे हे सर्व धंदे करायचे आणि इथून येऊन हे सगळं बोलायचं, हे कुठल्या नियमात बसतं? सगळ्याला जिल्ह्याला माहिती आहे, सर्व दफ्तरी नोंद आहे, या सगळ्यामागे कोण आहे? रेतीच्या दलाल्या कोण करतं, कुणाच्या ट्रक चालतात? आमच्याकडे रेतीची तस्करी कोण करतं? अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहिती आहे. सदरे नावाचा पीआय बिचारा त्याला ब्लॅकमेल करुन, त्याच्याकडून खंडण्या मागून, शेवटी त्याने आत्महत्या करुन घेतली.
खडसे : काय आत्महत्या केली?
गिरीश महाजन : नाही… नाही. मला बोलूद्या ना. तुम्ही बोलले ना, रेतीचं, कापसाचं सांगत आहात ना, उपोषणाला बसलो. मलाही सांगू द्याना. काय धंदे केले ह्यांनी?
सचिन अहिर : यावेळी सचिन आहेर यांनी आक्षेप घेतला. सदस्य बोलत आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे की प्रत्युत्तर देणं सुरु आहे का? त्यांनी 35 ची नोटीस न देता बोलले असतील तर तुमचा तो अधिकार आहे.
गिरीश महाजन : मी कुणाचं नाव घेतलं नाही
एकनाथ खडेस : वाळू माफियाबद्दल मी बोललो. वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रात आहे. जळगावात वाळू माफियांचं काल जे प्रकरण घडलं, त्या प्रकरणात कुणाचा हात आहे? सरकार 5 वर्षे झाले तुमचं आहे, सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही? सरकारने का बांगड्या घातल्या आहेत? वाळू माफियांवर काम करताना तुम्ही हातात काय बांगड्या घातल्या आहेत का? तुम्हाला का कारवाई करता येत नाही? कापसाला का भाव देता येत नाही? आज कापसासाठी शेतकरी मरायला लागला आहे.
गिरीश महाजन : वाळू माफिया जळगावमध्ये कोण आहे? सदरे नावाच्या पीआयने कुणामुळे आत्महत्या केली? इथे काहीतरी खोटं बोलायचं. चाललंय काय? बरोबर चाललं आहे. म्हणजे रॉयल्टीमध्ये चोरी, स्टॅम्प ड्युटीमध्ये चोरी. घरचे तीन-तीन लोकं जेलमध्ये बसले ना, इथे येऊन नुसती बडबड करायची. अहो चोऱ्या कुणी केल्या? भरल्या घरात काय झालं? पोराला का मारलं? का तोंड काळं केलं? मी तर म्हणतो नार्कोटेस्ट करा.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी मध्यस्थी केली. वैयक्तिक टीका-टीप्पणी करण्यासाठी हा मंच नाही. हा जनतेसाठी सुरु असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याबाबत चर्चा अपेक्षित आहे. त्या व्यतिरिक्त वैयक्तिक टीका करणं हे अपेक्षित नाही. आपण अनुभवी सदस्य आहात, अशी कानउघाडणी सभापतींकडून करण्यात आली. यानंतर खडसे बोलू लागले.
खडसे : मी माझं भाषण शांततेने करत होतो. त्यामध्ये कुणाच्या बुडाला आग लागण्याची आवश्यकता नव्हती. अध्यक्ष महोदय, माझा विषय कापसाबाबत होता. कापसाला भाव नाही. मग सरकारमधल्यांनी म्हटलं की, तुम्ही विरोधी पक्षनेता असताना उपोषण केलं. आनंदाची गोष्टी आहे. मी ते मुंडे साहेबांना बोलावून उपोषण सोडवलं. तुम्ही तेव्हा माझे पाय धरत होते. माझं उपोषण सोडवा, दहा दिवस झाले, कोणी सोडवायला येत नाही, माझे उपोषण सोडवा. विचारायला कुणी येत नाही. मी मुंडे साहेबांना बोलावलं. जाऊदे त्या विषयावर मी बोलत नाही. तुम्हाला एवढे आरोप करायचे आहेत, सरकार तुमचं आहे, तुम्ही सीबीआय किंवा आणखी कुणाकडून चौकशी करा. नाथाभाऊंचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल. नुसते आरोप करायचे, खोटेनाटे गुन्हे करायचे. ईडी सारखे गुन्हे दाखल करायचे, तुम्हाला काय आरत्या ओवाळायच्या काय? आम्ही काय गुन्हा केला? नाथाभाऊंचा त्या प्रकरणाशी काय संबंध? वाळू माफिया असेल तर तुम्हाला चौकशीसाठी कोणी रोखलं? माझी मागणी आहे की, वाळू माफियांवर मोक्का दाखल करा
(यानंतर सभागृहाचं कामकाड स्थगित केलं जात असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. या विषयावर उद्या पुन्हा दुपारी 12 वाजता चर्चा होईल, असं सभापतींनी जाहीर केलं)
