
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आल्याचं पहायला मिळत आहे. भाजपनं अनेक ठिकाणी या महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटासोबत युती केली आहे. मात्र आता डोंबिवलीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून भाजप कार्यकर्त्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले आणि जोरदार राडा झाला. डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 29 तुकाराम नगर परिसरात असलेल्या दशरथ भुवन इमारतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक घरात एका -एका मतदाराला तीन हजार रुपयांची पाकिटं वाटल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. डोंबिवलीच्या प्रभाग क्रंमाक 29 मध्ये शिवसेना आणि भाजपात मैत्रीपूर्वक लढत होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्याना भाजपच्या तीन पुरुष कार्यकर्ते व एका महिला कार्यकर्त्याला रंगेहाथ हात पकडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्याकडे जवळपास सत्तर ते ऐंशी हजाराची रोख रक्कम आढळून आल्याचा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. अनेक पैशांची पाकिटं देखील तेथील एका घरात आढळून आले आहेत.
दरम्यान जिथे ही पैशांची पाकीटं आढळून आली तिथे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. या तीनही कार्यकर्त्यांना त्यांनी पकडून ठेवलं. घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परत देखील त्या ठिकाणी दाखल झाले, नंदू परत घटनास्थळी पोहोचताच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटात जोरदार राडा झाला. सध्या या परिसरात तणावाचं वातावरण आहे. निवडणूक आयोग आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुदरम्यान देखील असाच प्रकार पहायला मिळाला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घरावर पैसे वाटपाचा आरोप करत छापा टाकला होता, त्यावेळी देखील वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं.