डोंबिवलीत रिक्षा चालकाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
डोंबिवलीच्या मोठागावमध्ये एका रिक्षा चालकाने अपघातानंतर कार चालकाकडून दोन लाख रुपयांची भरपाईची मागणी केल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. मुंजाजी शेळके या 70 वर्षीय रिक्षा चालकाने कार अपघातातून मानसिक त्रास सहन करून गळफास घेतला.

डोंबिवलीच्या मोठा गाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने 70 वर्षीय रिक्षा चालकाकडून दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंजाजी शेळके असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. मुंजाजी शेळके यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्यामुळे डोंबिवली शहर हादरलं आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात मुंजाजी शेळके हे रिक्षा चालवत असताना त्यांनी एका कारला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर कार चालकाने शेळके यांना पकडून ठेवलं. त्यानंतर त्यांना खूप मारहाण केली. पहाटे ३ वाजता त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यावेळी शेळके यांच्याकडून कार चालकाने दोन लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. दोन लाख रुपये कुठून आणायचे? या विचाराने मुंजाजी शेळके मानसिक तणावात होते.
घरी गळफास लावून आत्महत्या
त्यानंतर या सगळ्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी टोकाचं पाऊल उचलत आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे डोंबिवली शहर हादरलं. या घटनेमुळे संतापलेल्या शेळके यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
कसून चौकशी सुरु
जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. सध्या विष्णू नगर पोलीस स्टेशनवर रिक्षाचालक आणि नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे.
