मराठा आंदोलनाचा असाही फटका, खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरात दुपटीने वाढ
मराठा आंदोलन चिघळल्याने रास्तारोको आणि दगडफेकीने एसटी आणि खाजगी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी सेवा त्यामुळे बंद करण्यात आली आहे. याचा फायदा घेऊन आता खाजगी ट्रॅव्हल्स पुणे - नागपुर आणि नागपूर - संभाजीनगर भाड्यात मोठी वाढ केली आहे.
मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनाचा फटका राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेला बसला आहे. मराठवाड्यात अनेक भागात एसटीची तोडफोड झाली आहे. त्यामुळे अनेक बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास 50 एसटी डेपोची बस वाहतूक दक्षता म्हणून गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम खाजगी बस वाहतूकीने दरवाढ करण्यात झाला आहे. प्रवासी संख्या घटल्याने तसेच धोका पत्करून बस सेवा चालवावी लागत असल्याने ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नागपूरने तिकीटाचे दर वाढविले आहेत.
मराठा आंदोलन चिघळल्याने रास्तारोको आणि दगडफेकीने एसटी आणि खाजगी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 75 हून अधिक एसटी बसेसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाचे 20 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे 20 ते 22 खाजगी बसेसचे तोडफोड झाली आहे. त्यामुळे धोका पत्करून बस चालवाव्या लागत आहेत. त्यातच 20 ते 25 टक्के प्रवासी घटल्याने परतीच्या बसेस रिकाम्या येत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नागपूर या संघटनेने तिकीट दरात वाढ केली आहे. नागपूर – पुणे , नागपूर – संभाजीनगर खाजगी बसेसच्या तिकीटाचे दर 3500 रुपये म्हणजेच जवळपास दुप्पट झाले आहेत. दिवाळीमुळे बसेस चालवाव्या लागत अनेक बसेसचे मार्ग बदलावे लागल्याने तिकीटदरात वाढ केल्याचे ट्रव्हल्सचे अध्यक्ष बाबा डवर यांनी म्हटले आहे. बसेसवर अशीच दगडफेक सुरु राहिल्यास सेवा बंद ठेवावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
येवला बस आगार ठप्प
मराठा क्रांती मोर्चा हिंगोलीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यांमध्ये 22 ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. नांदेड, हिंगोली राज्य महामार्ग नांदेड,परभणी राज्य महामार्ग त्याचबरोबर जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील सर्व राज्य महामार्गावर हे आंदोलन झाले. येवला आगाराची बस सेवा मंगळवारपासून बंद असल्याने 132 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येवला आगाराते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाला गेल्या पाच-सहा दिवसात 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
टॉवरवर चढून आंदोलन
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. आरक्षण न मिळाल्यास टावरवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. उमेश प्रकाश शिरगिरे आणि आबा जाधव अशी त्यांची नावे असून पोलीसांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.