‘घर जाळलं, मुलींना मारहाण केली, कोंबडे घेऊन गेले…’, खोक्याची भावजयी नेमकं काय म्हणाली?
रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली. त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता त्याच्या नातेवाईकांकडून माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सतीश उर्फ खोक्या भोसले हा चांगलाच चर्चेमध्ये आहे. शिरूरमधील ढाकणे कुटुंबाला झालेल्या मारहाणीनंतर तो फरार होता. अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या, त्यानंतर आता त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान खोक्याचं घर हे वनविभागाच्या जागेत असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर वनविभागाकडून त्याला नोटीस देखील देण्यात आली होती. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अखेर गुरुवारी वनविभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं, त्याचं घर पाडण्यात आलं.
मात्र त्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली. त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता त्याच्या नातेवाईकांकडून माहिती समोर आली आहे. खोक्याची भावजयी अर्चना भोसले यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, रात्री आमचे लेकबाळ येथे झोपले होते, आमच्या शेळ्या मारून टाकल्या, कोंबडे घेऊन गेले, मुलींना सुद्धा खूप मारलं. ते लोक म्हणत होते तुमचे घर पाडले तुम्ही इथे कसे राहता तुमचा काय संबंध आहे. वीस पंचवीस जण होते. आता या प्रकरणात फडणवीस साहेबांनी कारवाई केली पाहिजे, आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी अर्चना भोसले यांनी केली आहे.
तर खोक्या भोसलेची दुसरी भावजयी शालन भोसले यांनी सांगितलं की, काल आम्ही इथे झोपलो होतो, त्याचवेळी ही घटना घडली आहे. मारहाण करण्यात आली. आम्ही सर्वजण सरकारी दवाखान्यात आहोत, आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शालन भोसले यांनी केली आहे.
नेमकं काय घडलं?
खोक्याचं घर हे वनविभागाच्या जागेवर होतं, ते गुरुवारी पाडण्यात आलं. मात्र त्यानंतर पाडलेल्या घराला रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी आग लावल्याची घटना घडली आहे. यावेळी मारहाण देखील केल्याचा आरोप खोक्याच्या नातेवाईकांनी केला आहे.