
ED Raid : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने रविवारी (28 ऑगस्ट) रोजी अमित अशोक थेपाडे यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. कॅनरा बँकेशी संबंधित 117.06 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या आरोपाअंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. थेपाडे बराच काळ अधिकार्यांना चकवा देत होते. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील एका नामांकित पाचतारांकित हॉटेलमध्ये ते गेल्या दोन महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीने अटकेची ही कारवाई केली.
थेपाडे राहात असलेल्या हॉटेलवर टाकलेल्या धाडीददरम्यान 50 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली. तसेच 9.5 लाख रुपयांची रोकड, 2.33 कोटी किमतीचे बुलियन, सोने व हिरे जडीत दागिने, दोन वाहने आणि वित्तीय व्यवहारांशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे असू शकणारी डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. माननीय विशेष न्यायालयाने (PMLA) त्यांना 5 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ईडीने तपासाची सुरुवात सीबीआय, एसीबी, पुणे यांनी दाखल केलेल्या दोन गुन्ह्यांच्या आधारे केली होती. हे गुन्हे गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. (GCCPL) आणि मित्सॉम एंटरप्रायजेस प्रा. लि. (MEPL) यांच्याशी संबंधित आहेत. या दोन्ही कंपन्या अमित थेपडे यांच्या मालकीच्या असून त्यांनी कॅनरा बँकेत विविध स्थावर मालमत्तांना तारण ठेवून कर्ज घेतले होते. तपासात उघड झाले की, आरोपींनी आधीच विकलेल्या किंवा एकाच मालमत्तेवर दोनदा तारण ठेवून बँकेला फसवले आणि त्यातून मिळालेले पैसे स्वतःच्या वापरासाठी वळवले, असा आरोप करण्यात आलाय.
अमित थेपडे यांनी गुन्हेगारी मार्गाने मिळालेल्या निधीचे थर तयार करून त्याचे मूळ स्वरूप लपवण्यासाठी आणि तो कायदेशीर वाटावा असा भास निर्माण करण्यासाठी एक गुंतागुंतीचे आर्थिक जाळे उभारले होते. दीर्घकालीन गुप्त तपास, देखरेख आणि फॉरेन्सिक आर्थिक विश्लेषणानंतर त्यांच्या अनेक संशयास्पद व्यवहारांचा पर्दाफाश झाला, असे ईडीचे मत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.