शिंदेंच्या मंत्र्याला मोठा दणका, अधिकारी नातेवाईकांवर ईडीची मोठी कारवाई; तातडीने पत्रकार परिषद घेऊन काय म्हणाले मंत्री?
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आता यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. संजय राऊतांनी शिंदेंच्या एका मंत्र्यावर गंभीर आरोप केली आहेत.

मुंबई : तब्बल 18 तासानंतर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण झाली. सकाळी सात ते रात्री दीड वाजेपर्यंत ईडी अधिकारी यांनी माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची चौकशी केली. या कारवाईत ईडीने कुणालाही ताब्यात घेतले नसून, काही कागदपत्र, हार्ड डिस्कमधील मोठा डाटा जमा करून घेतला आहे. रात्री दीड वाजता अधिकारी आयुक्त निवास्थानातून बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आलाय. माजी आयुक्त अनिलकुमार पवार हे मंत्री दादा भुसे यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. फक्त दावाच नाही तर त्यांनी थेट गंभीर आरोप देखील केले. भुसेंच्या सांगण्यावरूनच आयुक्तपदी पवार यांना बढती दिल्याचे सामनात लिहिण्यात आले. यानंतर आता दादा भुसे यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले.
दादा भुसे यांनी म्हटले की, राऊतांनी नेहमीप्रमाणे पोपटपंची केली. पूर्ण अभ्यास न करता त्यांनी ठिकाणी आरोप केले आहेत. होय…पवार हे माझे नातेवाईक आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाच्ची दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही आणि त्या कुटुंबामधील हे पवार आहेत. पण मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते या नोकरीत आहेत, त्यांनी विविध ठिकाणी नोकरी केली आहे.
आता वसई विरारचा विषय आहे तर माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्याठिकाणी वसई विरारच्या महापालिका आयुक्तपदावर त्यांना पोस्टिंग केलेली आहे. आता राहिला विषय कोण कोणाचे नातेवाईक आहे. तर यावरून चाैकशीला काही फरक पडत नसतो. चाैकशीतून जे काही सत्य आहे ते पुढे येईल, जे कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई होईल. यापूर्वीही त्यांनी माझ्यावर व्यक्तीगत पातळीवर खोटे आरोप केले होते.
साखर कारखान्यावरून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले होते. त्यावरून मी त्यांच्यावर दावा केला होता. या दाव्यावरून मी पाठीमागे जावे म्हणून ते असे खोटे आरोप आता माझ्यावर करत आहेत. एकेकाळी ते माझे नेते होते मी देखील त्यांच्या घरी जात होतो. ते देखील मला ओळखतात आणि मी पण त्यांना ओळखतो. पण राजकारण असे खोटे आरोप करणे चुकीचे आहे. दादा भुसेंचे लाखो नातेवाईक आहेत. शिवसेना पक्षातील सर्व पदाधिकारी नातेवाईक आहेत , मला वाटते की, पाठीमागच्या काळात त्यांच्यावर जो दावा दाखल केला, त्यामधून पळ काढण्यासाठी ते असे करत आहेत.
दादा भुसे यांची अनिल पवार यांची त्यांनी शिफारस केली की नाही याच स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ. संजय राऊत यांना पोडियमवर येऊन बोलायचं आणि मग बिळात लपून बसायचं याव्यतिरिक्त काहीही काम नाही. अनिल पवार यांची नियुक्ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली मग ती राऊतानी केली असे मीही म्हणू शकतो. राऊत कोणासाठी काय शिफारशी करतात हे आम्ही सांगायच का ? माझे हजार नातेवाईक आहेत मग सगळीकडे फक्त आरोप हे उत्तर असू शकत नाही.
