
Eknath Shinde Speech : मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. तसेच मी लोकांसाठी काम करणारा माणूस आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्रिपदी असताना कोणकोणती कामे केली, याचीही माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, अशा सूचना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्या भाषणात त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी सर्वात मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे आता शेतकऱ्यांच्या डोक्यावरील आर्थिक भार कमी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाल आहे. आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांची पूर्ण ताकदीने मदत करणार आहोत, असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी शिवसेना पक्षातर्फेही एक मोठी घोषणा केली. अतिवृष्टीग्रस्त कुटुंबात ज्या मुला-मुलींची लग्न ठरलेली असतील ती लग्न आम्ही शिवसेना पक्षातर्फे लावून देऊ, असे शिंदे यांनी भाषणात जाहीर केले आहे. ही घोषणा करताना “मराठवाड्यात, विदर्भात अतिवृष्टीचं मोठं संकट आलं. अनेकांच्या आयुष्यात संकट आले आहे. यात अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. या अतिवृष्टीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुला-मुलींची लग्नं ठरली असतील त्या सर्वांची लग्न लावून देण्याची जबाबदारी शिवसेना घेत आहे,” अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसेच या लग्नांची पूर्ण जबाबदारी शिवसेनेची आहे. बांधिकलकी म्हणून मी जबाबदारी घेत आहे. माझ्याकडे दोन हात आहेत. माझे हे हात रिकाम नाहीत, असेही मत शिंदे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. आता एकच लक्ष समोर असले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकावयचा आहे. आपापसातले सगळे मतभेद विसरून जा. कामाला लागा. आपल्याला निवडणुका नवीन नाहीत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तसेच, पुढचं 2026 हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आगामी वर्षात बाळासाहेब ठाकरेंचे जन्मशताब्दी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले जाईल, असेही शिंदे यांनी जाहीर केले. शेतकरीदेखील संकटात आहेत. त्यांना जेवढी-जेवढी मदत करता येईल तेवढी करा. उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एक बैठक आहे. या बैठकीत आम्ही निर्णय घेऊ, असेही यावेशी शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. पण जिथे-जिथे मदत करता येईल, तिथे शिवसैनिकांनी मदत करावी. बळीराजाचे अश्रू पुसण्याचे काम आपण करू, असे आस्वासनही त्यांनी यावेळी दिले.