Sachin Ahir : एकनाथ शिंदे शिवसेनेतील बड्या नेत्याने मन वळवल्यामुळे फुटले सचिन अहिर, त्या नेत्याचं नाव आलं समोर

Sachin Ahir : सचिन अहिर यांचा मातोश्रीच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये समावेश व्हायचा. ते फुटतील असं वाटत नव्हतं. पण तरीही सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. सचिन अहिर कसे फुटले, त्यांना फोडण्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली त्याची माहिती समोर आली आहे.

Sachin Ahir : एकनाथ शिंदे शिवसेनेतील बड्या नेत्याने मन वळवल्यामुळे फुटले सचिन अहिर, त्या नेत्याचं नाव आलं समोर
Sachin Ahir Join Shivsena
| Updated on: Jul 01, 2026 | 8:54 AM

खासदार फुटल्यानंतर आठ दिवसात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. मातोश्रीच्या जवळचे मानले जाणारे आमदार सचिन अहिर फुटले. त्यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे, जे खासदार फुटले त्यांच्या मतदारसंघातील दौरा आटोपून परत येत नाहीत, तोच ही बातमी आहे. खासदार फुटल्यानंतर आमदार फुटणार, ठाकरे गटात मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे अशा बातम्या सुरु होत्या. त्यात काल अचानक सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. सचिन अहिर हे मातोश्रीच्या अतिशय निकटवर्तीय होते. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू होते. वरळीत आदित्य ठाकरे आल्यानंतर सचिन अहिर सतत त्यांच्यासोबत सावली सारखे दिसायचे. असा नेता फुटून बाहेर पडल्यामुळे झटका बसणं स्वाभाविक आहे.

22 जून रोजी खासदार फुटले. त्यानंतर सचिन अहिर यांच्यासोबत चर्चा सुरु झाल्याची माहिती आहे. सचिन अहिर यांना फोडण्यात प्रताप सरनाईक यांनी महत्वाची भूमिका बजावली. ठाण्यातून आमदार असलेले प्रताप सरनाईक सरकारमध्ये मंत्री आहेत. सरनाईक हे एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक आहेत. प्रताप सरनाईक आणि सचिन अहिर यांची जुनी मैत्री आहे. ठाकरेंपासून अहिरांना तोडण्यात हीच मैत्री कामी आली. पूर्वी प्रताप सरनाईक आणि सचिन अहिर हे दोन्ही नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते. तेव्हापासूनची त्यांची ओळख आहे. आता सचिन अहिर यांना ठाकरे गटातून फोडण्यात ही जुनी ओळख, मैत्री उपयोगात आली. सचिन अहिर यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या शब्दावर पक्ष बदल केला. प्रताप सरनाईक यांनी त्यांचं मन वळवलं.

ठाकरे गटाकडून वरळीमध्ये डॅमेज कंट्रोल

सचिन अहिर बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाकडून आता डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरु झाले आहेत. वरळीमध्ये काल शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सचिन अहिर यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात जनसंर्पक आहे. त्यांच्यासोबत कार्यकर्ते फुटू नयेत, यासाठी वरळीमध्ये ठाकरे गट डॅमेज कंट्रोलच्या मोडमध्ये आहे. काल रात्री मातोश्रीवर बेस्ट कामगार सेनेची बैठक पार पडली. सचिन अहिर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष होते. सचिन अहिर यांना विविध युनियन्सचं अध्यक्षपद सांभाळण्याचा अनुभव आहे. दक्षिण मुंबईतील अनेक मिल्समध्ये त्यांची यूनियन होती.

 

Follow Us