जरांगेंचा इशारा तरी संजय जाधवांचा थाटात कार्यक्रम, स्टेजवर जाऊन शिंदेंचे आरक्षणावर मोठे विधान; म्हणाले जरांगे…

आज परभणीमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला आहे, विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या इशाऱ्यानंतर देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे.

जरांगेंचा इशारा तरी संजय जाधवांचा थाटात कार्यक्रम, स्टेजवर जाऊन शिंदेंचे आरक्षणावर मोठे विधान; म्हणाले जरांगे...
एकनाथ शिंदेंचं मराठा आरक्षणावर मोठं विधान
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 4:51 PM

आज परभणीमध्ये शिवसेनेचा शेतकरी मेळावा पार पडला, खासदार संजय जाधव यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. दरम्यान या मेळाव्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यांनी खासदार संजय जाधव यांना इशारा देखील दिला होता. मात्र तरी देखील हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

मला कोणावरही टीका करायची नाही, ठरलेला कार्यक्रम ऐनवेळी रद्द करणं शक्य नव्हतं. मराठा समाजाला न्याय देण्याची सुरुवात महायुती सरकराने केली. कोणाचंही आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे.  मनोज जरांगे पाटलांची समाजाविषयीची तळमळ मला माहितीये. आताही आमचे मंत्री जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत आहेत, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे खासदार संजय जाधव यांनी देखील दिलगिरी व्यक्ती केली आहे.  मी मनोज जरांगे पाटील यांचे मनापासून स्वागत करतो,  साहेब 11 वाजता कार्यक्रम होता, ऐन वेळी कार्यक्रम रद्द झाला असता तर लोकांनी मला मारलं असतं.  माहिती नाही काय संकट ओढावलं असंत. जर तुमच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं खासदार संजय जाधव यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमादरम्यान गोंधळ 

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा कार्यक्रमस्थळी आले तेव्हा मराठा आंदोलक चांगेलच आक्रमक झाले, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच शिंदे बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर देखील घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतलं. आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.

 

Follow Us