
यवतमाळमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. हे तुमचं सरकार आहे, आमचं सरकार म्हणजे नो रिजन ऑन द स्पोट डिसिजन आहे. प्रत्येक कामाला रिजन देणाऱ्यांचा सिझन आता संपला आहे. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह केला. विधानसभेत आता आपलंच सरकार येईल म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं. याला जेल मध्ये टाकू हे करू बर्फावर झोपून मारू असे म्हणत होते, मात्र त्यांचे हॉटेल बुकिंग लाडक्या बहिणींनी रद्द केले. डूब गये अहंकार मे सारे, अब तो सुधार जावो प्यारे, असा खोचक टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणींना पायावर उभे करायचे आहे, लखपती बनवायचे आहे. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण आम्हाला सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत. आज शंभर दिवस झाले, सरकार वेगानं पळत आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी दीड हजार कुटुंबाला आधार झाले आहेत. सर्व अर्थव्यवस्थेमध्ये लाडकी बहीण एक नंबरवर आहे. कर्ज घेतात एकही रुपया बुडवीत नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मी दिलेलं या हाताचे या हाताला कळत नाही. मला तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान केला. तुमचा आशीर्वाद व शुभेच्छांमुळे हे सर्व शक्य झालं. तुम्ही आहात म्हणून सगळे पुरस्कार आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी मी एक कार्यकर्ता आहे. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्य लोकांची सेवा करेल, सत्ता येते, जाते, पद येते जाते. पण मला लाडका भाऊ ही ओळख मिळाली, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आणि मान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.