Pratap Sarnaik : सरनाईकांच्या शेजारी संजय राऊतांचा भाऊ, शिंदे सेनेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं राऊतांच्या घरी जाण्यामागचं कारण
Pratap Sarnaik : "एनडीएचे घटक पक्ष कुठून आले, महाविकास आघाडी कशी बनली, अनेक वर्ष काँग्रेसच्या विरोधात राहणारी शिवसेना आज त्यांच्यासोबत आहे. एनडीसोबत नसलेले पक्ष आज एनडीए सोबत आहेत. चांगलं काम करतायत. राजकारणात कधीही, काहीही घडू शकतं असं मी मानतो" असं प्रताप सरनाईक म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात आज भुवया उंचावणारी घटना घडली. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक हे भांडूपला संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले. खरंतर दोन्ही शिवसेनेमध्ये कट्टर शत्रुत्व आहे,अशावेळी प्रताप सरनाईक अचानक राऊतांच्या निवासस्थानी पोहोचल्याने राजकीय तर्क-वितर्क सुरु झाले. दरम्यान प्रताप सरनाईक यांनी आपण संजय राऊतांच्या निवासस्थानी का गेलो होतो ते स्पष्ट केलं. “सुनील राऊत आणि संजय राऊत यांची आई गेल्या कित्येक वर्षांपासून मला ओळखते. दरवर्षी दिवाळीत त्या मला लाडू पाठवतात. मधल्या काळात एक वर्ष मला येता आलं नाही. मागच्या महिन्यात त्या पडल्या. ऑपरेशन झालं. मी त्यांना फोन केलेला तेव्हा त्यांनी मला दिवाळीत येण्याचं निमंत्रण दिलेलं” असं प्रताप सरनाईक म्हणाले.
“मी संजय राऊतांना नाही, त्यांच्या आईला भटायला आलेलो” असं त्यांनी सांगितलं. पण संजय राऊतांशी तुमची भेट झाली, यावर प्रताप सरनाईक म्हणाले की, “मला वाटलं संजय राऊत नसतील 10 वाजता ते निघून जातात. पण ते घरी होते,भेट झाली. संजय राऊत हे राष्ट्रीय नेते आहेत. शिवसेना पक्ष एकत्र असताना आम्ही एकत्र काम केलय. माझं त्यांच्याशी कौटुंबिक नातं आहे. राजकीय क्षेत्रातले लोक भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होणारच. आता काय चर्चा झाली हे मी तुम्हाला सांगणार नाही”
शेतकऱ्याच्या घरी पिठलं-भाकरी खाल्ली
दोन्ही शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे का? “बघा, राजकारणात कधीही, काहीही होऊ शकतं. पण सध्या ती चर्चा नाही. आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. आमचा संसार सुखाचा चालला आहे. आम्हाला मोठ्या प्रमाणात बहुमत आहे. विकासाच्या जोरावर आम्ही अनेक गोष्टी साध्य करत आहोत. दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहकार्य करत आहोत” असं सरनाईक म्हणाले. “एकनाथ शिंदे यांनी आवाहन केल्याप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मदत करतोय. प्रत्येक शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काल एकनाथ शिंदे जालन्याला गेले होते. त्यांनी शेतकऱ्याच्या घरी पिठलं-भाकरी खाल्ली. शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्यांची दिवाळी कशी गोड करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री स्वत: शेतकऱ्यांच्या घरी गेले होते. पंतप्रधानांना त्यांची दखल घेऊन कौतुक करावं लागलं. आमचं सुखात चाललं आहे” असं प्रताप सरनाईक म्हणाले.
म्हणालो तुझी शंभरी साजरी करु
लाडूंचा गोडवा राजकीय एकत्र येण्यात येणार का? यावर प्रताप सरनाईक यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं. “माझे आणि संजय राऊत यांचे व्यक्तिगत संबंध आहेत. आईच्या लाडूंचा गोडवा वेगळा असतो. संजय राऊत यांच्या आई आज 87 वर्षांच्या आहेत. मी त्यांना शुभेच्छा दिल्या. म्हणालो तुझी शंभरी साजरी करु. सुनील आणि संजय ज्या पद्धतीने आईवर प्रेम करतात, ते पाहून मला त्यांचा हेवा वाटतो. एवढ्या मोठ्या पदावर असून पण ते जे आईला मान-सन्मान देतात, ते खरच कौतुकास्पद आहे” असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.