Nilesh Rane : घमेंड, फुकटचा आत्मविश्वास इगो कोणासाठी ? निलेश राणेंचा रोख कोणावर?
Nilesh Rane :"या शहराचा विकास शिवसेनाच करू शकते. मी कुठल्याही टिकेला उत्तर दिलेले नाही. ज्यांना मी शहर अध्यक्ष केले, ते आज ती माझ्यावर माझ्या पक्षावर टिका करत आहेत. चार देतो म्हणताहेत तुमचे चारही येणार नाहीत. चारपण येऊ द्यायचे नाही. येणार तर 21 आमचेच शिवसेनेचेच यायला हवेत आणि येणारच.काय बोलतो, कोणासमोर बोलतो, दुपारी माझ्याबरोबर बोलायचे आणि संध्याकाळी प्रेस घ्यायची. त्यांचे बोलाविता धनी वेगळा आहे" असं निलेश राणे म्हणाले.

“मालवण शहरात गुलाल आणि फटाके शिवसेनेचेच उडणार असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व 20 ही जागा निवडून आणणारच, कुठेही कमी पडणार नाही. जे करायचे ते जिद्दीवर ही शिकवण आणि संस्कार आमच्यावर आहे. यामुळे मालवण नगरपालिकेची ही निवडणूक आम्ही लढणार आणि जिंकणार तेही जिद्दीवर!” असं आमदार निलेश राणे म्हणाले. “तुम्ही कोणला थकवायला बघता?, आम्हाला! प्यादाच वजीर होवू शकतो, वजीर प्यादा होवू शकत नाही. बुद्धीबळाचा खेळ मला माहिती आहे. हे हत्ती, घोडे या सगळ्यांना बाजूला करणार आणि हा प्यादा वजीरच होणार आहे” असं निलेश राणे म्हणाले. “तुम्ही नको त्यांच्या नादाला लागलात. निलेश राणे शांत होता आणि मालवणच्या लोकांसाठी शांतच राहणार आहे. या शहरासाठी शांत राहणार आहे. पण अंगावर आलात तर नाही सोडणार. काहींना वातावरण बिघडवायचं आहे, तुम्ही बिघडू देऊ नका. या शहरात गुलाल आणि फटाके आपलेच उडणार आहेत” असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.
“या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला जनता मतदान करणार आहे. निवडणूक चांगल्या वातावरणात आणि महायुतीमध्ये व्हावी कोणत्याही कार्यकर्त्याचे नुकसान होवू नये. त्याच्यावर कोणतेही दडपण येवू नये यासाठी माझा प्रयत्न होता.मी स्वतः दोन पराभव बघितलेले आहेत. यामुळे कार्यकर्त्यांना त्रास होवू नये यासाठी मी युतीसाठी प्रयत्न करत होतो. विजयाची टांगती तलवार कार्यकर्त्यांवर असू नये यासाठी जीवापाड प्रयत्न केले. जे माझ्या स्वभावात बसत नाही, मला पटत नव्हतं. तरीही माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो, पण प्रयत्न काही यशस्वी झाले नाहीत” अशी खंत निलेश राणे यांनी बोलून दाखवली.
नारायण राणेंचा मान शिवसेना ठेवणार
“काहींना युती व्हावी अशी इच्छा होती, तर काहींना युती नको होती. राजकारणामध्ये कार्यकर्त्यांच्या भरवशापेक्षा काहींचा इगो महत्वाचा आणि मोठा असतो.हा इगो आम्ही कधीच केला नाही, ही निवडणूक आमची नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ही जी निवडणूक कार्यकर्त्यांची होती, ते सहज जिंकले असते तर दुखः ते कोणाल होते. खासदार नारायण राणे यांची इच्छा होती, युती व्हायला हवी. नारायण राणेंचा मान शिवसेना ठेवणार आहे” असं निलेश राणे म्हणाले.
त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली
“खासदार नारायण राणे यांचा जीव आहे मालवणवर. ते नेहमी म्हणतात मला ओळख मालवणने दिली. मी एवढे प्रयत्न करूनही जर कोणी युती करत नसतील तर कशाला युती करायची नव्हती ते निवडणुकीतून तुम्हाला सगळं कळेल.घमेंड, फुकटचा आत्मविश्वास इगो कोणासाठी ? यामुळेच आज महायुतीतील घटक पक्ष समोरासमोर उभे आहेत. आपल्या उमेदवारांसाठी मी वेळोवेळी वाकलो, मी त्यांच्याकडे शरण गेलो, काही लोकांना कार्यकर्त्यांचे सुख आणि दुखः कळत नसेल तर आता त्यांना जागा दाखविण्याची वेळ आली आहे” असं निलेश राणे म्हणाले.
राणे साहेबांचा शब्द पडू देणार नाही
“कोणतीही तडजोड करायची नाही. ही खासदार नारायण राणेंची निवडणूक आहे आणि खासदार राणेंचा आशिर्वाद आमच्या मागे आहे. मी त्यांचा आशिर्वाद घेऊन आलेलो आहे. राणे साहेबांचा शब्द पडू देणार नाही, मालवण नगरपालिका राणे साहेबांना भेट म्हणून देणार आहे. कारभार कसा असतो, लोकांना कसा कारभार हवा आहे, आम्ही लोकांवर कारभार लादणार नाही” असं निलेश राणे म्हणाले. “लोकांना जे अभिप्रेत आहे जे हवं आहे त्यादृष्टीने काम करणार आहे. नको त्या लोकांच्या हातात मालवणचा कारभार देऊ नये. काही लोकांचे उदरनिर्वाहाचे साधनच म्हणजे नगरपालिका आहे. नगरपालिका हे एक मंदिर आणि पवित्र स्थान आहे. त्याठिकाणी पवित्र लोकच गेले पाहिजेत.आमचे सगळे उमेदवार अतिशय पारदर्शक निष्कलंक आणि एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले उमेदवार आहेत” असं निलेश राणे यांनी सांगितलं.
