Ravindra Dhangekar : त्यांना दरवाजाबाहेर का उभं केलेलं? हे सांगीन..रवींद्र धंगेकर यांची डायरेक्ट फडणवीस यांच्या जवळच्या दोन नेत्यांना वॉर्निंग
Ravindra Dhangekar : विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना सुरु आहे. त्यात रवींद्र धंगेकर यांची रोजची विधानं वातावरण आणखी तापवत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रवींद्र धंगेकर यांचं नाव गाजत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपने या निवडणुकीत पदवीधरच्या तीनही जागा गमावल्या. त्यासाठी भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर पोस्ट करुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबाबदार धरलं. शिंदे शिवसेनेने पुणे, नागपूरमध्ये अपेक्षित सहकार्य केलं नाही. त्यामुळे फटका बसला असा नवनाथ बन यांचा आरोप होता. त्यावर नवनाथ बन यांच्यावर शिंदे शिवसेनेचे नेते तुटून पडले आहेत. बन यांची अगदी लायकीही काढण्यात आली. त्याला नवनाथ बन यांनी उत्तर दिलं. रवींद्र धंगेकर विरुद्ध नवनाथ बन यांचा व्यक्तिगत सामना सुरु आहे असं वाटतं.
दोन्ही बाजूंकडून परस्परांवर खूप खालच्या पातळीची टीका केली जातेय. आता रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या दोन बड्या नेत्यांशी पंगा घेतला आहे. प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर. हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याजवळचे आहेत. धंगेकरांनी जुन्या गोष्टी काढत थेट त्यांना इशारा दिला आहे.
त्यांना दरवाजाबाहेर का उभं केलेलं?
“प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची उंची मला माहित आहे. कारण आम्ही दोघे एकाच पक्षात होतो. त्यांना कशा पद्धतीने मनसे सोडायला लागली हे सांगीन मी कधीतरी, त्यांना दरवाजाबाहेर का उभं केलेलं? शेवटी पळून जावं लागलं त्यांना. मी कुठल्या स्वार्थासाठी कुठल्या पक्षात गेलो नाही, पदं घेतल नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
शिंपी गल्लीत राहतो. सगळ्यांच मोजमाप असतं माझ्याकडे
“त्यांनी लाचर पद्धतीने पदं मिळवली. प्रसाद लाड उद्योगासाठी आले. एकदा भेटायला जाणार या आठवड्यात. ते माझे मित्र आहेत. अंगलट येईल असं बोलू नका. माझं तोंड किती शांत आहे, माझ तोंड एकदा फाटलं की सगळं उद्धवस्त होईल” असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला. “शिंपी गल्लीत राहतो. सगळ्यांच मोजमाप असतं माझ्याकडे. काही लोक मला म्हणतात बारा पक्ष फिरुन आलो, दोन-तीन पक्षातून आलोय. पण त्यांनी 14 पक्षांशी युती केली त्याचं काय?. शिंदेसाहेब मला बोलले आता शांत राहा आणि दुष्काळावर काम करा. म्हणून मी शांत राहतोय. बाकीचा सातबारा आहे माझ्याकडे” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
