पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्याने,वृद्ध मातेने घेतला मंदिराचा आसरा, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना
ज्या वयात मुलांनी आई-वडिलांच्या हाताची काठी बनणे अपेक्षित असते, त्याच वयात पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडल्याने एका मातेला मंदिरात जगावे लागल्याची घटना घडली आहे.

ज्या मुलांना नऊ महिने पोटात सांभाळलं, नंतर त्यांना न्हाऊमाखु घातले आणि वाढवले त्याच मुलांनी म्हातारपणात आईला वाऱ्यावर टाकल्याची हृदयद्रावक घटना सातारा येथे घडली आहे. या आईला आता दोन वेळच्या जेवणासाठी मंदिराच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.याही अवस्थेत लेकरांच्या भेटीची आस घेऊन जगणाऱ्या ६५ वर्षांच्या रुक्मिणी सदाशिव भस्मे यांना म्हातारपणात एकाकी जगण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथे राहणाऱ्या रुक्मिणी सदाशिव भस्मे यांच्यावर पतीच्या निधनानंतर मुलांचा आसरा राहिला. पतीच्या मृत्यूनंतर संसाराचा गाडा हाकणे कठीण झाल्याने त्या पाटण तालुक्यातील मुरूड या आपल्या गावी परतल्या. मात्र, जगण्याचे कोणतेही साधन उरले नसल्याने त्यांनी आपल्या दोन मुलांसह पोटाची खळगी भरण्यासाठी सातारा शहर गाठले.
१० वर्षांपासून त्या साताऱ्यात वेगवेगळ्या भागात भाड्याच्या खोलीत त्या राहत होत्या.रुक्मिणी यांच्या दोन्ही मुलांचे अद्याप विवाह झालेले नाहीत. परिस्थिती बेताची असतानाही मुलांच्या संगोपनात त्यांनी कोणतीही कमतरता भासू दिली नाही. मात्र, काळ बदलला तशी मुलेही बदलली. सुरुवातीला मोठ्या मुलाने घर सोडले, आणि पाठोपाठ धाकट्या मुलानेही आईची कोणतीही जबाबदारी न घेता घराशी संबंध तोडला. मुलांकडून घरभाड्यासाठी दरमहा मिळणारे दोन हजार रुपयेही अखेर बंद झाले.
अनेक महिने घरभाडे थकीत राहिल्याने अखेर घरमालकाने रुक्मिणी यांना रूम खाली करण्यास सांगितले. खांद्याला आधार देणारी लेकरेच दुरावल्याने आणि डोक्यावरचे छत हिरावल्याने या मातेला सातारा शहरातील एका मंदिराचा आसरा घ्यावा लागला आहे. आज मंदिरामध्ये कोणी प्रसाद किंवा अन्न दिले, तरच या मातेचे पोट भरत आहे. या अत्यंत बिकट परिस्थितीत काही जाणकार व्यक्तींनी त्यांना वृद्धाश्रमात जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, त्या आजही आपल्या मुलाची वाट पाहत आहेत. त्यांचा लहान दोन नंबरचा मुलगा रणजीत भस्मे हा सध्या साताऱ्यात राहत असला, तरी त्याने अनेक दिवसांपासून आईची साधी विचारपूस सुद्धा केलेली नाही.
माझा रणजीत मला नक्की सांभाळेल, अशी मला आशा आहे. त्याने जर माझ्याकडे लक्ष दिले नाही, तरच नाईलाजाने मला वृद्धाश्रमाचा विचार करावा लागेल, अशी प्रतिक्रिया रुक्मिणी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ शी बोलताना दिली.
ज्या वयात मुलांनी आई-वडिलांच्या हाताची काठी बनणे अपेक्षित असते, त्याच वयात पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडल्याने ही घटना केवळ एका कुटुंबाची नसून आधुनिक समाजाच्या मूल्यांना लागलेला मोठा डाग आहे. या हृदयद्रावक प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन या हतबल मातेला न्याय मिळवून देणे आणि हक्काचा निवारा मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.
