
Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 15 जानेवारी रोजी राज्यात एकूण 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. सभा, बैठकांचे राज्यभर सत्र चालू आहे. राज्यात सत्तेत असलेला शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून आपल्या प्रचारात लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख केला जात आहे. एकीकडे प्रचाराची रणधुमाळी चालू असताना राज्यात पात्र लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये मिळणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु आता राज्य सरकारला मोठा दणका बसला आहे. निवडणूक आयोगाने या पैसे वाटपाबाबत सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार लाडक्या बहिणींना येत्या 14 जानेवारी रोजी एकूण 3000 रुपये देणार होते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकूण 3000 रुपये दिले जाणार होते. 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्याच्या एक दिवस अगोदर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार होते, म्हणून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात होती. महिला मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठीच हे पैसे दिले जात आहेत, असा आरोप केला जात होता. विशेष म्हणजे हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते.
Maharashtra Election Commission bars state govt from releasing January stipend for ‘Ladki Bahin’ scheme amid civic polls model code. pic.twitter.com/opGz4GAZio
— Press Trust of India (@PTI_News) January 12, 2026
दरम्यान, आता या प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे. राज्य सरकारला लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये देता येणार नाहीत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना 14 जानेवारी रोजी 3000 रुपये न मिळता 1500 रुपये मिळणार आहेत. राज्य सरकारला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त डिसेंबर महिन्याचेच 1500 रुपये टाकता येतील.