
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप करत टीका केली. निवडणूक आयोगाने विरोधकांना, काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही. एकाच व्यक्तीचं कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप केला होता. मतचोरीच्या मुद्यावरून त्यांनी रान उठवत भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्ला चढवला. त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधाऱ्यांना मात्र घाम फुटला असून निवडणूक आयोगावर टीका केलेली असतानाच त्यांची उत्तरं मात्र भाजपकडून दिली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर राहुल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी एकदा त्यांनी चेक करावे, कदाचित त्यांचा एक तर मेंदू चोरीला गेला आहे किंवा मेंदू मधून चीप चोरीला गेली आहे म्हणून ते वारंवार असं बोलत आहेत, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.
मात्र आता इंडिया आघाडीतील अनेक नेते आता राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरले असून अनेक विरोधकांनीही राहुल गांधी यांची बाजू बरोबर असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज नागपूर दौरा असून त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांना भाजपकडून जे उत्तर दिलं जातंय, त्यावरून त्यांनी टोला हाणला.
काय म्हणाले शरद पवार ?
राहुल गांधी यांनी जे आरोप केले, त्यांनी जो आक्षेप घेतलाय तो निवडणूक आयोगावर. त्यांनी निवडणूक आयोगासंबंधी आक्षेप घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनी आपली मतं मांडायला , पुढे यायची कारणं काय ते मला समजू शकत नाही, आम्हाला जे उत्तर हवयं ते निवडणूक आयोगाकडून हवयं, भारतीय जनता पक्षाकडून नाही असं म्हणत पवारांनी भाजपला टोला हाणला. राहुल गांधी यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिले पाहिजे. त्यांनी राहुल गांधींकडे शपथपत्र मागणे चुकीचे आहे, असेही शरद पवार म्हणाले.
भाजप आणि निवडणूक आयोगाने विविध राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभेत मतं चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या अनेक मंत्र्यांनी त्यांच्यावर आगपाखड केली होती. हा मुद्दा देशात चांगलाच गाजत असून याच पार्श्वभूमीवर सोमवार 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीतर्फे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.