खवड्या डोंगरावरून पडून कुटुंब संपलं, कुणालची आई व्हिडीओमध्ये वांरवार उल्लेख करायची, ती महिला कोण? धक्कादायक माहिती
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मन हेलावणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला, आता या प्रकरणात नव नवीन माहिती समोर येत आहे, तसेच काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली होती, या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा सुन्न झाला. आत्महत्येच्या उद्देशानं देवळाई परिसरात असलेल्या खवड्या डोंगरावर पोहोचलेल्या तरुणासोबतच डोंगरावरून पडून त्याच्या आई-वडिलांचा देखील मृत्यू झाला. एका क्षणात अख्ख कुटुंब संपलं. काही वर्षांपूर्वी या तरुणाच्या मोठ्या भावाचं आजारामुळे अकाली निधन झालं होतं, त्यानंतर आता या तिघांचा देखील मृत्यू झाला आहे. कुणाल चांदगुडे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर आता कुणालची आई संगीता चांदगुडे यांचे काही जुने युट्यूब व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यावरून हे स्पष्ट होतं आहे की, त्यांच्या घरात काहीतरी वाद होता.
संगीता चांदगुडे यांचा एक जुना व्हिडीओ आता समोर आला आहे, ज्यामध्ये त्या चांगल्याच आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. ‘तुला काय वाटतं? नवरा बायकोचं भांडण लावून दिलं, भावाला घरी बोलावून घेतलं म्हणजे माझ्या मुलांचं शिक्षण बंद होईल? माझे हाल होतील आणि मी तुला फोन करेल, मी तुझ्या पाया पडेल? पण असं काही होत नसतं ग, तुझं स्वप्न हे स्वप्नच राहणार आहे,’ असं संगीता चांदगुडे यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. दरम्यान संगीता चांदगुडे यांनी हे ज्या महिलेला उद्देशून म्हटलं आहे, ती महिला संगीता चांदगुडे यांची नणंद असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून त्यांच्या कुटुंबात आधीच काहीतरी वाद होता, असं दिसून येत आहे.
कुणालचे त्याच्या वडिलांसोबत सतत कोणत्या न कोणत्या कारणावरून खटके उडत होते, परंतु त्याचं त्याच्या आईसोबत चांगलं बॉडिंग होतं. संगीता चांदगुडे यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी आपल्या मुलासोबतचे अनेक भावनिक क्षण व्हिडीओ स्वरुपात पोस्ट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये कुणाल आपल्या आईचे पाय धुताना दिसत आहे, तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये कुणाल आपल्या आईसोबत चहा पिताना दिसून येत आहे. पती आणि मुलगा डोळ्यादेखील डोंगरावरून खाली कोसळल्याचा धक्का त्या सहन करू शकल्या नाहीत, आणि त्यांनी देखील डोंगरावरून उडी घेतली. या घटनेत तिंघाचाही मृत्यू झाला.
