महिला सरपंच अपात्र घोषित ! अशी कोणती चुक नडली ? ग्रामीण भागात महिला फक्त नामधारीच असतात का?
नाशिकच्या घोटी खुर्द येथील ग्रामपंचायत जिल्ह्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. थेट महिला सरपंच असलेल्या ताई बिन्नोर यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

नाशिक : दिल्लीचं राजकारण बरं पण गावाचं राजकारण नको रे बाबा… असं ग्रामीण भागात आजही म्हंटलं जातं. त्याचं कारण सर्वश्रुत आहे. भाऊबंदकी, रस्त्याचा वाद, लग्न कार्यात न येणे, दु:खाच्या समयी न भेटणे अशी विविध कारणं असतात. आणि ह्याच सर्व कारणाचा वचपा काढण्याची संधी म्हणजे गावचं राजकारण आणि ग्रामपंचायत निवडणूक. याच ग्रामपंचायतीवर निवडून जाणं एकवेळेला सोप्पं पण पाच वर्षे आपल्या हातून एकही चुक् होणार नाही हे जास्त अवघड असतं. आणि याचाच फटका नाशिकमधील घोटी खुर्द या गावाला बसला. विशेष म्हणजे एकदा नाही दोनदा या गावच्या सारपंचांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरवलं आहे. थेट सरपंच म्हणून निवडून आलेल्या एका महिला सरपंचाला अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील हे गाव आहे. घोटी खुर्दच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याची माहिती समोर आली आहे., याचे कारण म्हणजे या महिलेच्या पती आणि सासऱ्याच्या नावावर ग्रामपंचायतीचे चेक काढले गेले होते.
घोटी खुर्दच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांच्या पतीसह सासऱ्याच्या नावावर ग्रामपंचायतीच्या वतिने काही कामाच्या संदर्भात चएक काढण्यात आले होते.
नियमानुसार ही बाब गंभीर आहे. पण गाव पातळीवरील राजकारण बघता या बाबी होतच राहतात म्हणून दुर्लक्ष केलं जातं.
पण विरोधक असलेल्या शिवाजी एकनाथ फोकणे यांनी निवडणुक विवाद अर्ज दाखल केला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला भ्रष्टाचार दाखवत कारवाईची मागणी केली होती.
नऊ हजार आणि तीन हजार रुपयांचे चेक त्यांनी काढले होते हे सिद्ध झाले आणि अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी ही कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे नुकत्याच सरपंच असलेल्या ताई बिन्नोर यांच्या आधी सरपंच असलेल्या मंदाकिनी विष्णुपंत गोडसे या देखील अपात्र ठरविण्यात आल्या होत्या.
एकूणच काय तर गावचं राजकारण करतांना जरा जपून, नियमांचे पालन करूनच व्यवहार करा अन्यथा घोटी खुर्दच्या प्रकरणासारखी पुनरावृत्ती तुमच्याही गावात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
