अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयाला आग, तीन बाळांचा मृत्यू, आमदार सुलभा खोडके घटनास्थळी दाखल
अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन बाळांचा मृत्यू झाला आहे, या घटनेनंतर आता आमदार सुलभा खोडके या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

अमरावतीच्या जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे, तर सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर आता आमदार सुलभा खोडके यांनी रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. ‘नुकतंच अमरावतीमध्ये महिलांसाठी हे दोनशे बेडचं रुग्णालय ओपन करण्यात आलं आहे. महिलांना आणि बाळांना चांगले उपचार मिळावेत या उद्देशातून आपण हे रुग्णालय सुरू केलं आहे. परंतु आज जी दुर्दैवी घटना घडली आहे, ती विचार करण्यासारखीच आहे. कारण एवढ्या नव्या बिल्डिंगमध्ये असं होणं म्हणजे फार घातक आहे, असं यावेळी सुलभा खोडके यांनी म्हटलं आहे.
आजची घटना जी घडली ती फार दुर्दैवी आहे. या घटनेमुळे आता रुग्णालयावरच प्रश्न निर्माण झाला आहे. जी माहिती समोर आली त्याप्रमाणे व्हेंटिलेटर फुटून ही आग लागली. या आगीत होरपळून तिन बालकांचा मृत्यू झाला आहे. इथे एकूण 9 बाळं होती, त्यातील सहा जणांना सुरक्षितरित्या बाहेर हलवण्यात आलं आहे. माझं या संदर्भात नुकतंच सीएस साहेबांशी बोलणं झालं आहे. मी त्यांना विचारलं की, हे जे काही व्हेंटिलेटर लावण्यात आले होते, त्यावर नियंत्रण कोणाचं होतं? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपलाच माणूस होता, त्याने रोज चेक करायला पाहिजे होतं. यावरून मला असं वाटतं की याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं आहे, या घटनेची चौकशी करण्यात येईल, असं खोडके यांन म्हटलं आहे.
दरम्यान व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली, त्यामुळे सध्या असाही प्रश्न उपस्थित होत आहे की, हे व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाची बसवण्यात आले होते का? यावर देखील आमदार सुलभा खोडके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे नव्हते कारण त्याची टेस्टिंग करण्यात आली होती, टेस्टिंग केल्यानंतरच ते आपण ताब्यात घेतले होते, अशी माहिती यावेळी खोडके यांनी दिली आहे. परंतु त्यामध्ये नेमका काय बिघडा झाला? हे आता तरी सांगता येणार नाही, मात्र आपण जेव्हा त्याची चौकशी करू, तेव्हा ते कारण समोर येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
