MPSC पेपर लीक प्रकरणानंतर आता आणखी एक मोठा घोळ! परीक्षा न देताच प्रमाणपत्र; महाराष्ट्रात खळबळ

- पेपर लीकच्या अनेक प्रकरणानंतर आता आणखी एक घोळ! - FMGE परीक्षा उत्तीर्ण न होता ही मिळत होतं प्रमाण पत्र

MPSC पेपर लीक प्रकरणानंतर आता आणखी एक मोठा घोळ! परीक्षा न देताच प्रमाणपत्र; महाराष्ट्रात खळबळ
mpsc scam and FMGE SCAM
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Oct 05, 2026 | 7:38 PM

FMGE Paper Scam : सध्या राज्यात एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनेक परीक्षांतील पेपरफुटी प प्रकरणं सध्या चर्चेत आहेत. या पेपरफुटीविरोधात विद्यार्थी पुण्यात आंदोलन करत आहेत. पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलकांची आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे राज्य सरकार तसेच एमपीएससी हे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान एकीकडे  ही पेपरफुटी चर्चेत असताना आता दुसरीकडे आणखी एक मोठा घोळ समोर आला आहे. परीक्षा उत्तीर्ण न होताच उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वाटले जात होते. विशेष म्हणजे हे सगळं घडवून आणण्यासाठी एक रॅकेट काम करत होते. याच रॅकेटचा आता पर्दाफाश झालाय.

समोर आलेल्या माहितीनुसार FMGE परीक्षा उत्तीर्ण न होताच प्रमाणपत्रांचे वाटप केले जात होते. महाराष्ट्र सायबर पोलिसांनीच हे सगळं चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. भारतात डॉक्टर म्हणून नोंदणी मिळवण्यासाठी बनावट वैद्यकीय परीक्षा कागदपत्रं तयार केली जात होती. त्यासाठी आंतरराज्यीय नेटवर्क काम करत होते. याबाबतची माहिती समोर मिळताच महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलने तक्रार केली होती. दाखल तक्रारीनुसार महाराष्ट्र सायबरकडून तपास करण्यात आला होता.

Loading...

परदेशात मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्यांना भारतात डॉक्टर म्हणून कामं करायचं असल्यास FMGE ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते.  Foreign Medical Graduate Examination असं या परीक्षेचं नाव असून ती उत्तीर्ण झाल्यासंच डॉक्टर म्हणून काम करण्याची परवानगी आहे, असं नमूद असलेलं प्रमाणपत्र मिळतं. मात्र FMGE परीक्षा उत्तीर्ण न होताही काही परदेशी वैद्यकीय पदवीधरांकडे वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र असल्याचे तपासात समोर आले आहे. तांत्रिक विश्लेषण, डिजिटल रेकॉर्ड आणि सिस्टम लॉगच्या तपासातून आरोपींचा शोध घेण्यात आलाय. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. बुलढाणा जिल्ह्यातील वरुण प्रतापराव आखाडे (28) आणि संकेत प्रभाकर उन्हाळे (26) असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोन्ही आरोपी स्वतः परदेशातून MBBS झालेले अर्जदार आहेत. त्यांनी FMGE परीक्षा उत्तीर्ण न होताही वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय. डिजिटल आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासातून नाशिकमधील राहुल गोपाळ पाटील (35) याचाही शोध घेण्यात आलाय. राहुल पाटील हा आंतरराज्यीय टोळीतील महत्त्वाचा ऑपरेटर असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने सुमारे 15 ते 20 अर्जदारांसाठी बनावट FMGE स्कोअरकार्ड, प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे तयार करून दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पैसे घेऊन बनावट कागदपत्रे तयार करून देत असल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us