मोठी बातमी! सचिन वाझेला जामीन मंजूर
former sachin vaze get bail in case of antilia house Mansukh hiren case : मोठी बातमी! सचिन वाझेला जामीन मंजूर

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईच्या मुंबई सत्र न्यायालयाने वाझेला अँटिलिया बॉम्बकांड प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात सचिन वाझे याच्यासहित आणखी काही आरोपींच्या नावाचा समावेश आहे. अँटिलिया बॉम्बकांड प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आधीच काही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. त्यात मुंबई पोलिसातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा, सुनील माने, रियाजुद्दीन काजी यांच्या नावाचाही समावेश आहे. विशेष कोर्टाने 1 ऑगस्ट रोजी त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले. त्यानंतर आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत हत्या, खंडणी, पुरावा नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे या प्रकरणी खटला चालवण्यात येणार आहे.
वाझेला 5 जिल्ह्यात बंदी
अँटिलिया बॉम्बकांड प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. मुंबईतील विशेष सत्र न्यायालयाकडून आरोपी सचिन वाझेला जामीन मंजूर केला आहे. 1 लाखांच्या वैयक्तिक बॉण्डवर आणि त्याच रकमेच्या स्थानिक जामीनदारावर सुटका करण्यात आली आहे. सुमारे साडेपाच वर्षांच्या दीर्घ कारावासाच्या पार्श्वभूमीवर जामीन मिळाला आहे. वाझेकडे पासपोर्ट असल्यास तो NIAकडे जमा करण्याचे न्यायालयाचे निर्देश देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जाईपर्यंत मुंबईसह 5 जिल्ह्यांत प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत राहण्यासही मनाई करण्यात आली आहे. न्यायालयीन कामकाजासाठीच या जिल्ह्यांत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. राहत्या ठिकाणाचा पत्ता 7 दिवसांत NIAला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच दर रविवारी स्थानिक पोलीस ठाण्यात दुपारी 12 ते 3 दरम्यान हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. साक्षीदारांशी संपर्क न करण्यासह पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.
वाझे याला सुमारे साडेपाच वर्षांपासून तुरुंगात असल्याने दीर्घ कारावासाच्या आधारावर जामीन मिळाला. अँटिलिया बॉम्बकांड आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझे आरोपी आहे. दीर्घकाळ कारावासात असल्याचा मुद्दा जामीन देताना न्यायालयासमोर महत्त्वाचा ठरला आहे. परंतु अन्य प्रकरणात सचिन वाझे आरोपी असल्याने तुरुंगातच राहण्याची अधिक शक्यता आहे. वाझेला २४ तास पूर्ण चार्जिंग असलेला फोन बाळगण्याच्या सूचना असतील. एनआयए हवे तेव्हा संपर्क करून व्हिडिओ कॉल करून वाझेबद्दल पुष्टी करेल अशीही अट ठेवण्यात आली आहे.
