बाजारातून घरी जात होती शिक्षिका, रस्त्यात घडली ही दुर्दैवी घटना, टिप्परने केला घात

शिक्षिकेचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे टिप्पर चालकाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला.

बाजारातून घरी जात होती शिक्षिका, रस्त्यात घडली ही दुर्दैवी घटना, टिप्परने केला घात
| Updated on: May 26, 2023 | 4:20 PM

शाहिद पठाण, प्रतिनिधी, गोंदिया : वाळूचे टिप्पर काही केल्या कुणाच्या नियंत्रणात नसतात. एकतर बहुदा ही वाळू चोरीची असते. त्यामुळे घाईघाईत टिप्पर कसा काढता येईल, याचा विचार चालक करत असतो. अशावेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. अशीच एक घटना तिरोड्यात घडली. टिप्पर जोराने जात होता. समोर एक शिक्षिका बाजारातून घरी जात होत्या. टिप्परचा मागील टायर त्यांच्या स्कूटरवरून गेला. यात शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. शिक्षिकेचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या घटनेमुळे टिप्पर चालकाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला.

टिप्परच्या धडकेत मृत्यू

गोंदिया जिल्ह्याचा तिरोडा शहरातील शहीद मिश्रा शाळेजवळ अपघात झाला. आज दुपारच्या सुमारास वाळू वाहून नेणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत स्कूटर चालवणाऱ्या महिला शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला.

येवांगणा कुंभलकर असे मृत शिक्षिकेने नाव आहे. ती बाजारातून आपल्या एमएच 35 आर 6118 क्रमांकाच्या हिरो प्लेजर स्कूटरने घरी जात होती. तेवढ्यात काळ बनून आलेल्या वाळूचा टिप्पर एमएच 35 एजे 1033 ने मागील बाजूने धडक दिली.

मागील टायरमध्ये आल्याने मृत्यू

या धडकेत मागील टायरमध्ये येऊन येवांगणा यांचा जागीच मृत्यू झाला. येवांगणा कुंभलकर या सरांडी गावात प्रगती प्राथमिक आश्रम शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तिरोडा येथे पाठवण्यात आला. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहे.

दुचाकीवरील महिलेला दुखापत

दुसऱ्या एका घटनेत, रायगड जिल्ह्यातील खोपोली पेण रोड आणि खोपोली पाली रोडवर असणाऱ्या पालीफाटा चौकात MSRDC मार्फत उड्डाण पुल आणि रस्ता रुंदीकरण काम सुरू आहे. मोठा ट्रेलर पेण दिशेला वळण घेत असताना दुचाकीवरून रस्ता क्रॉस करत होता. दुचाकी ट्रेलरखाली आल्याने अपघात होण्याची शक्यता होती.

मात्र प्रसंगावधान साधून ट्रेलर चालकाने गाडी थांबवली. दुचाकीवरील महिलेला किरकोळ दुखापत झाली. मात्र मोठा अनर्थ टाळला. दुचाकीस्वार हे खोपोली पाली रोडवरील कारगाव येथील असल्याची माहिती मिळते. परंतु दुचाकीवरील दोघेही सुखरूप आहेत.