ऑनलाईन जुगारातून व्यापाऱ्याची फसवणूक, गोंदिया पोलीस विभागाने दिला सावधानतेचा इशारा

| Updated on: Jul 26, 2023 | 8:19 PM

या प्रकरणानंतर गोंदिया पोलीस विभाग सक्रिय झाले. ऑनलाईन बनावटी गेमिंग अॅपद्वारे फसवणूक सुरू असल्याने पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

ऑनलाईन जुगारातून व्यापाऱ्याची फसवणूक, गोंदिया पोलीस विभागाने दिला सावधानतेचा इशारा
Follow us on

गोंदिया : ॲानलाईन जुगारातून नागपुरातील व्यापाऱ्याची ५८ कोटींची फसवणूक झाली. त्यानंतर व्यापारी आक्रमक झालेत. सरकारने देशातून ॲानलाईन जुगाराचे ॲप बंद करावे. संपूर्णपणे ॲानलाईन जुगार बंद करावा, अशी मागणी नाग विदर्भ चेम्बर्स ॲाफ कॅामर्स या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय. या प्रकरणातील आरोपी सोंटू नवरतन जैन याने ५८ कोटींची फसवणूक केली. त्यामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांनी देशात ॲानलाईन जुगारावर बंदीची मागणी केली. दरोडे किंवा चोरीतून टॅक्स मिळाला तर हे सरकार दरोडे कायदेशीर करणार का? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणानंतर गोंदिया पोलीस विभाग सक्रिय झाले. ऑनलाईन बनावटी गेमिंग अॅपद्वारे फसवणूक सुरू असल्याने पोलिसांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.

ऑनलाईन गेमिंग हा गुन्हा

खेळाच्या माध्यमातून लवकर श्रीमंत होण्याकरिता युवा वर्गाचा कल ऑनलाईन गेमिंगकडे वाढलेला दिसतो. ऑनलाईन गेम खेळण्यासाठी विवीध कंपनीचे अधिकृत गेम ॲपसारखे बनावटी गेम ॲप तयार केले आहेत. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी नागरिकांना आमिष दाखवून प्रलोभन दिले जाते. यासाठी सोशल मीडियाच्या साधनांचा वापर केला जातो. त्यात व्हॉट्सॲप, मेसेंजेर, टेलिग्राम चॅनल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादीद्वारे ऑनलाईन बनावटी गेमिंग अॅपमध्ये खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. युवा वर्ग अशा गेमिंग ॲपवर विश्वास ठेवून लवकर श्रीमंत होण्याच्या नादात याकडे ओढले जातात. ऑनलाईन बनावटी गेमिंग हा गुन्हा आहे.

गेमिंगची लावली जाते सवय

गोंदियातील सोनटू नवरतन जैन याच्या घरी छापा टाकून नागपूर पोलिसांनी कारवाई केली. आरोपीकडून रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने पोलीसांनी जप्त केले. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून करोडपती होण्याचे आमिष दाखवले जाते. युजर नेम आणि पासवर्ड देऊन गेमिंगची सवय लावली जाते.

हवे त्याला जिंकवता किंवा हरवता येते

ऑनलाईन बनावटी गेमिंग अॅपचा उद्देश मोठ्या प्रमाणावर लोकांची फसवणूक करण्याचा असतो. बनावटी गेमिंग अॅप तयार करणेकरिता ऑनलाइन फ्री लान्सर, प्रोग्रामर सर्वत्र उपलब्ध आहेत. गेमिंग अॅपचे ऍडमिन पॅनल तयार करून त्याद्वारे हवे त्याला जिंकवता येते आणि हवे त्याला हरविता येते.

येथे करा तक्रार

कोणत्याही ऑनलाईन गेमिंग ॲपच्या फंदात पडू नका. कुठल्याही प्रकारच्या जलद श्रीमंत होण्याच्या आमिष, प्रलोभनाला पडू नये. ऑनलाईन बनावटी गेमिंग ॲपच्या माध्यमाने आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्यास आपली तक्रार नोंदवा. त्यासाठी ऑनलाइन – https://cybercrime.gov.in/ या पोर्टलवर अर्ज करा. तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.