
Govandi Accident : मुंबईच्या गोवंडीत भीषण अपघात झाला आहे. येथे एका डंपरने चार तरुणांना चिरडलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात डंपरखाली आलेल्या तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. दरम्यान, ही दुर्घटना झाल्यानंतर इथे तणावाची स्थिती निर्माण झाली. अपघातस्थळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार गोंवडी येथील शिवाजीनगर येथील परिसरात हा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी येथे ठिय्या आंदोलन केले होते. घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातातील आरोपी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे या ठिकाणी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. परिणामी इथे मुंबई पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. हा अपघात का झाला? याचा शोध घेतला जात आहे. अपघातस्थळी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक टीमचं पथक इथे आलं असून तपास केला जात आहे.
तरुणांना चिरडल्यानंतर शेकडो नागरिक अपघातस्थळी जमा झाले होते. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. अपघातानंतर येथे लोकांची गर्दी वाढतच होती. त्यामुळे या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. लोकांची गर्दी झाल्यामुळे या भागात वाहतुकीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. घाटकोपर आणि विक्रोळी या भागातून येणारे आणि नवी मुंबईच्या दिशाने जाणारी वाहनं या अपघातामुळे अडकून पडली आहेत. त्यामुळेच हा रस्ता मोकळा करण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला आहे. या भागात दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आला आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात पोलीसही तैनात करण्यात आले आहेत.
१) नूर मोहम्मद गलेन, पुरुष/४२ वर्षे: मृत घोषित
२) आर्यन मोहम्मद गलेन, पुरुष/११ वर्षे: दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित
३) मोहम्मद हुसेन खान, पुरुष/११ वर्षे: दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित
४) अब्दुल गनी खान, पुरुष/९ वर्षे: दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित
दरम्यान, अपघातादरम्यान डंपरचालकाने मद्य प्राशन केलेले होते का? अपघाताचे नेमके कारण काय? याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील डंपर चालकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.