‘आता तो भाऊ एकटाच तिकडे…’, संजय राऊतांच्या पुस्तकावर गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या  ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  राऊत यांच्या या पुस्करावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

आता तो भाऊ एकटाच तिकडे..., संजय राऊतांच्या पुस्तकावर गुलाबराव पाटलांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 16, 2025 | 4:57 PM

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या  ‘नरकातील स्वर्ग’  या पुस्तकामध्ये अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असा दावा त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांना टोल लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक अतूट नातं आहे,  बाळासाहेबांचं आणि मोदी साहेबांचं एक वेगळं नातं आहे. बाळासाहेबांनी एक वाक्य वापरलं होतं, मोदी गया तो गुजरात गया. संजय राऊत त्यावेळेस पत्रकार होते, संपादक होते. त्यांना भाजपमध्ये काय चाललं ते माहीत नव्हतं. मात्र आता हा भाऊ एकटाच तिकडे राहिला आहे, त्यामुळे ते बोलत आहेत.

संजय राऊत त्यावेळी काय मध्यस्थ नव्हते, की त्यांनी त्यावेळी सर्व गोष्टी पाहिल्या. एवढ्या मोठ्या लोकांवर त्या माणसाने बोलनं मला उचित वाटत नाही. मोदी साहेबांच्या मनात बाळासाहेबांबद्दल कायमच आदराचं स्थान आहे. कायम राहणार आहे. आजही कोणी म्हणत असेल, बाळासाहेबांची शिवसेना संपली तर निश्चितच नाही. कारण आम्ही त्यांचे शिवसैनिक आजही जिवंत आहोत, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पीक विम्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. शासन आता 31 तारखेला पिक विम्या संदर्भात धोरण ठरवणार आहे. शेतकऱ्याबाबतचे प्रश्न कृषी मंत्री मांडतील आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ.  शेतकऱ्याने बियाणे घेताना , जे बाहेरचे बियाणे घेत आहे ते कृपया घेऊ नये. बियाणे घेत असताना शेतकऱ्यांनी पावती घ्यावी असं आवाहनही यावेळी पाटील यांनी केलं आहे.  शेतकरी हा कायम फसला जातो, तो फसू नये त्याच्याकरता कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांना जागृत केले पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.