Sanjay Raut : अडचणीच्या काळात ज्यांना मदत केली, त्यांनीच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला – संजय राऊतांचा पुन्हा घणाघाती आरोप

राजकारण न पाहता मदत करण्याचा बाळासाहेब ठाकरेंचा स्वभाव, पण मोदी-शहांनी त्यांचाच पक्ष आणि माणसं फोडली. उपकाराची परतफेड अपकाराने केली, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : अडचणीच्या काळात ज्यांना मदत केली, त्यांनीच बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला - संजय राऊतांचा पुन्हा घणाघाती आरोप
संजय राऊत
| Updated on: May 16, 2025 | 10:38 AM

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली, असा दावा राऊतांनी केला आहे. पण त्यांनी उपकाराची परतफेड अपकाराने केली, अशी टीकाही राऊतांनी माध्यमांशी बोलताना केली.

काय म्हणाले राऊत ?

पुस्तकात जे लिहीलं, मी त्याला गौप्यस्फोट म्हणत नाही, नरकातला स्वर्ग हे पुस्तक उद्या प्रसिद्ध होत आहे. मला ज्या पद्धतीने तुरुंगात पाठवलं, 100 दिवसांपेक्षा जास्त काळ मी तुरूंगात राहिलो, हे तिथले अनुभव आहेत. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरूंगात पाठवलं, त्यांच्याच अडचणीच्या काळात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांनी कशी मदत केली, त्या गोष्टी तुरूंगात मला आठवल्या, त्यापैकी अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे.गेल्या अनेक वर्षांत मी बऱ्याच गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर पाहिल्यात, ऐकल्या आणि अनुभवल्यादेखील. त्याचं पुस्तक लिहा, असं मला अनेक वेळा सांगण्यात आलं.

ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांसोबत राहून आपण केल्या आहेत,ते सीक्रेट मिशन , त्याबद्दल पुस्तकातून लिहीणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही गोष्टी या गोपनीय असल्याच पाहिजेत. मी फक्त संदर्भ दिला. गेल्या 30-35 वर्षांत काय घडलं होतं आणि काय घडतंय, त्याच्याविषयी अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की शरद पवार असो किंवा मा.बाळासाहेबव ठाकरे असतील, राजकारण न पाहता मदत करण्याचा महाराष्ट्रातील या 2 प्रमुख नेत्यांचा स्वभाव आहे. पण त्यांनी केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी अट्टाहास कसा केला हे सगळं मी पुस्तकात मांडलं आहे. एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला दिसला. उपकाराची फेड अपकाराने कशी केली, हे त्यातून मी मांडण्याचा प्रयत्न केला, असंही राऊत यांनी नमूद केलं.