अर्ध्या राज्याला पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, पत्रेही उडाले; या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान

Heavy Rain in Maharashtra : आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

अर्ध्या राज्याला पावसाने झोडपलं, वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली, पत्रेही उडाले; या जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान
Heavy Rain Half Maharashtra
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 08, 2026 | 9:36 PM

राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला, या पावसामुळे शहरातील 20 पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली आहे. मुख्य रस्त्यावर झाडे कोसळली असल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अमरावती महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू आहे.

चाळीसगाव तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक बरसलेल्या सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे आगामी शेती कामांनाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

करमाळा शहरात दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरासह परिसरात दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सध्या जोरदार पाऊस सुरू असून आकाश ढगांनी दाटून गेले आहे. अनेक भागांत पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अमरावतीमध्येही मान्सून पूर्व पावसाची हजेरी पहायला मिळाली. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे.

नागपूरमध्यही हलका पाऊस

नागपूरच्या काही भागात हलक्या पावसाला सुरवात झाली आहे. सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. दिवसभर उन्हाचे चटके आणि उकाडा जाणवला. त्यानंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. या हलक्या पावसाने नागपूरकराना काहीसा दिलासा मिळावा असला तरी यामुळे आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

बीडमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

बीडमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काल देखील जिल्ह्यात दमदार पाऊस झाला होता. या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. सलग दोन दिवस पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तापमान वाढल्याने जिल्ह्यातील पाणी पातळीत मोठी घट होत होती, मात्र या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

भंडाऱ्यात पावसाची रिप रिप

भंडारा जिल्ह्यात अचानक वातावरणात बदल झाला असून पावसाचे रिप रिप सुरू झाली आहे. दिवसभर जाणवणाऱ्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र दुपारच्या वेळी रिप रिप पावसामुळे तापमानात घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांचे रब्बी धान पिकाची कापणी शेवटच्या टप्प्याला सुरू असून जोरदार पाऊस पडल्यास धान पीकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

धाराशिवमध्येही पावसाच्या सरी

धाराशिव जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाची जोरदार एन्ट्री झाली आहे. पहिल्याच पावसात नदी नाल्यांना पाणी आले आहे. तेरणा नदीही वाहू लागली आहे. या पावसामुळे ऊन आणि उखाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब, वाशी आणि उमरगा परिसरात जोरदार पाऊस कोसळला.

वर्धा – सेलू तालुक्यात वादळी पाऊस

सेलू तालुक्यातील महाबळा परिसराला वादळी पाऊस सोसाट्याच्या वाऱ्याचा फटका बसला. दुपारच्या सुमारास अचानक वादळ आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. काही गोठ्यांवरील टिनपत्रे उडाल्याने काठी ठिकाणी नुकसान झाले आहे. वैरण भिजल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. जोरदार हवेमुळे केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सोलापूर – माढा तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची हजेरी

सोलापूरमधील माढा तालुक्यातील टेभुर्णी, उपळाई बुद्रूक, चिंचोली भुताष्टे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर शेतातील पीक पाण्याअभावी जळून चाललेल्या शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.

अहिल्यानगर – मिरजगावला पावसाने झोडपले

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगावला पावसाने झोडपले. आज परिसरात मुसळधार पाऊस पडला. आठवड्यात दुसऱ्यांदा जोरदार पाऊस कोसळल्याने परिसरातील शेतकरी सुखावला आहे. मशागतीची कामे पूर्ण झाल्याने येथील शेतकरी खरीपांच्या तयारीला लागले आहेत.

Follow Us