
परतीच्या पावसाने हाहाकार माजवलाय. मुंबईसह राज्यात संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही भागात पाणी साचण्यास सुरूवात झालीये. पुढीत दोन ते तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय. मुंबईमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर अधिक वाढल्याचे दिसत असून सर्वत्र काळोखा पसरला असून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसतंय. मुंबईतील पावसाचा परिणाम आता थेट लोकल सेवेवर झाल्याचे बघायला मिळत आहे. मध्य, वेस्टर्न आणि हार्बर लाईनला या पावसाचा चांगलाच फटका बसला आहे.
मध्य, वेस्टर्न आणि हार्बर लाईनवर रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. दादर रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मध्य रेल्वे लोकल 8 ते 10 मिनिटं उशिराने धाव आहे. कल्याण ते सीएसएमटी प्रवासावर परिणाम झालाय. वेस्टर्न रेल्वेवर विरार ते चर्चगेट लोकल 5 ते 7 मिनिटं उशिराने धावत आहे. हार्बर लाईनवर नेरूळ–सीएसएमटी लोकल 6 ते 7 मिनिटे उशिराने धावत आहे. आज सोमवार असल्याने कामावर जाण्यासाठी सकाळीच लोक निघाले. मात्र, पावसाचा फटका बसल्याचे दिसतंय.
लोकल सेवा सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे बघायला मिळतंय. मुंबईतील किंग सर्कल भागात पाणी साचण्यास सुरूवात झालीये. पावसामुळे मुंबईच्या लोकल सेवेवर परिणाम झालेला असतानाच आता तांत्रिक कारणामुळे मोनो रेल्वे सुद्धा बंद पडलीये. ज्यावेली ही मोनो रेल्वे बंद पडली, त्यावेळी तब्बल 17 प्रवासी हे या मोनोमध्ये होते. मोनोरेल बंद पडताच त्यांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आल आहे.
सध्या मोनोरेलच्या एकाच ट्रॅकवर दोन मोनोरेल असून ट्रॅकवरची सेवा अद्याप सुरळीत नाही. दादर पूर्व स्टेशन परिसरात गुडघाभर पाणी साचले. वाहनचालक-प्रवासी त्रस्त झाले आहेत. दादर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे. दादर पूर्वेतील स्वामीनारायण मंदिराकडून राजगृह दिशेने जाणारा रस्ता पाण्याखाली गेलाय. पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारेवरची कसरत सुरू आहे. प्रवाशांना पाण्यातून चालत स्टेशन गाठावे लागत आहे. सकाळपासून मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले.