Hingoli | ग्रामपंचायत निवडणुकीचा पराभव जिव्हारी, दोन गटात राडा, हिंगोलीत कुठे घडली घटना?

| Updated on: Sep 20, 2022 | 1:16 PM

सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत दोन्ही गटातील 20 ते 25 आरोपींवर गुन्हे दाखल झाले. औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Follow us on

रमेश चेंडगे, हिंगोलीः ग्रामपंचायत निवडणुकीतील (Gram Panchayat Election) निकालानंतर हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli) एका गावात तणावस्थिती निर्माण झाली आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथील रात्री उशीराची ही घटना आहे. निवडणुकीतील पराभव (Defeat in Election) जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही वादास सुरुवात झाली. विजयी उमेदवाराच्या घरासमोर पराभूत गटाने घोषणाबाजी केली. या कारणामुळे एकमेकांवर शिवीगाळ सुरु झाली. या शिवीगाळाचे रुपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झालं. दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही या भांडणात दुखापत झाली. यात तीन पोलीस जखमी झाले. सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत दोन्ही गटातील 20 ते 25 आरोपींवर गुन्हे दाखल झाले. औंढा नागनाथ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कुठे घडली घटना?

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा ग्रामपंचायतीत ही घटना घडली. येथे 9 सदस्यांसाठी निवडणूक पार पडली. यासाठी दोन गटांमध्ये चांगलीच चुरस झाली. सोमवारी औंढा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. त्यात रवंदळे गटाचे 5 उमेदवार तर गरड गटाचे 4 उमेदवार विजयी झाले.

निवडणुकीत बहुमत एका गटाला मिळाले. तर दुसऱ्या गटातील उमेदवार थेट निवडणुकीतून सरपंच म्हणून निवडून आला. त्यामुळे दुसऱ्या गटाने घोषणाबाजी सुरु केली.

औंढा पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढवा. तरीही दोन्ही गटांनी विजयी मिरवणूक काढली आणि त्यातून दोन्ही गट आपापसात भिडले. त्यानंतर मोठा राडा झाला.

हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवरच हल्ला करण्यात आला. यात रवी इंगोले, वसीम पठाण, राजकुमार कुटे हे कर्मचारी जखमी झाले.

मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरच विजयी गटाने हल्ला चढवल्याने गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.