Abhijit Dipke : अभिजीत दिपके यांच्या CJP ने निवडणूक लढवली तर किती मतदान होणार? सर्व्हेतून धक्कादायक माहिती
अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक लढवावी की नाही? लढवली तर किती टक्के मतदान होऊ शकतं, या संदर्भात हा सर्व्हे होता, या सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात संतपाचं वातावरण होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू होती. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी दिल्लीच्या जंतर-मंतरवर CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन उभारण्यात आलं. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले. तर दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर काही ठिकाणी दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या, अखेर दबाव वाढल्यामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान त्यानंतर आता असा प्रश्न उपस्थित होत आहे की, सीजेपीने राजकारणात यायला हवं की नाही? जर समजा ते राजकारणात आले तर त्यांना कितपत यश मिळू शकतं? याबाबत नुकताच सी व्होटर करून एक सर्व्हे करण्यात आला आहे.
या सर्व्हेमध्ये दोन महत्त्वाचे प्रश्न होते, ते म्हणजे अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या सीजेपीने राजकारणात यायला हवं की नाही? तसेच सध्या सीजेपीने कोणत्या मुद्द्यांवर काम करायला पाहिजे? त्यांच्यापुढे सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे? यावर उत्तर देताना जेन झी तरुणांनी सांगितलं की, सीजेपीच्या पुढे सध्या दोन सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते म्हणजे एक तर शिक्षण आणि दुसरा रोजगार त्यावर त्यांनी काम करण्याची गरज आहे.
तसेच या सर्व्हेमध्ये असाही एक प्रश्न विचारण्यात आला होता, की कॉकरोच जनता पार्टीने राजकारणात यावं की नाही? यावर 39 टक्के तरुणांचं मत आहे, की कॉकरोच जनता पार्टीने राजकारणात येऊ नये, त्यापेक्षा त्यांनी व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचं काम करावं, तर 26 टक्के लोकांना असं वाटतं की, सीजेपीने सक्रिय राजकारणात यावं, राजकारणात येऊन निवडणूक लढवावी.
दरम्यान यावेळी असा देखील प्रश्न विचारण्यात आला, की समजा सीजेपी निवडणुकीच्या मैदानात उतरली तर तुम्ही मतदान कोणाला करणार? यावर उत्तर देताना 33 टक्के लोकांनी आम्ही सीजेपीला मतदान करू असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे मात्र 43 टक्के लोकांनी आम्ही सीजेपीला मतदान करणार नसल्याचं म्हटलं आहे.
