महाराष्ट्रात सध्या पेट्रोल, डिझेल अन् एलपीजीचा नेमका किती साठा शिल्लक? भुजबळांनी थेट आकडेच मांडले, सांगितली आतली गोष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सलग दोन दिवस पेट्रोल, डिझेल जपून वापरा, सोन्याची खरेदी कमी करा असं आवाहन जनतेला करण्यात आलं आहे. त्यानंतर आता राज्यात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा साठा नेमका किती शिल्लक आहे? यावर भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला एकदा नाही तर दोनदा आवाहान केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सोनं कमी खरेदी करा, पेट्रोल, डिझेल, आणि एलपीजी गॅस या सारख्या इंधनाची बचत करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहानानंतर आता देशासह राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यावर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानंतर राज्यात सध्या स्थितीमध्ये पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजीचा किती साठा शिल्लक आहे? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तर भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ यांनी नेमकं काय म्हटलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे त्याचा नक्कीच विचार व्हायला हवा. ही परिस्थिती आपण निर्माण केलेली नाही जे देश पेट्रोलवर अवलंबून आहे तिथे झालेली आहे. याचे परिणाम सर्वांवरच होत आहे. काही दिवसांपूर्वी हाॅटेलवर निर्बंध होते हळूहळू ते सुरळीत केले, मात्र आता आपण त्या गोष्टी जपून वापरायला हव्यात. होर्मूजच्या खाडीत जे काही सुरू आहे त्यावरच पुढील गोष्टी अवलंबून आहेत. तिथे सर्व काही सुरळीत झालं तर काही अडचणी येणार नाहीत. मोदींनी दिलेला संदेश सर्वांसाठी आहे. थोडं काटकसरीने धोरण सर्वांनी ठेवायला हवं, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
राज्यात इंधनाचा किती साठा शिल्लक?
दरम्यान राज्यात सध्या इंधनाचा किती साठा शिल्लक आहे, याची आकडेवारी देखील यावेळी भुजबळ यांनी सादर केली. सध्या स्थितीमध्ये राज्यात पेट्रोल १ लाख ५९ लाख लिटर शिल्लक आहे. डिझेल २ लाख ९८ हजार लिटर शिल्लक आहे. केरोसीन ४ हजार किलोलीटर शिल्लक आहे. तर एलपीजी ३५ हजार किलो शिल्लक आहे, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. यासोबतच सर्वांनी आता काटकसरीचं धोरणं ठेवावं असं आवाहानही यावेळी भुजबळ यांनी केलं.