
देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे, आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे उत्तर भारत, पूर्व भारत, पूर्वोत्तर भारत, दक्षिण भारत, पश्चिम भारत आणि मध्य भारतामध्ये या आठवड्यात भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस सहा, सात आणि आठ सप्टेंबर रोजी गुजरात राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार आहे.
दुसरीकडे आठ सप्टेंबरपर्यंत उत्तराखंड आणि राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील अनेक भागांना देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. सहा आणि सात सप्टेंबर रोजी पूर्व आणि पश्चिम मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यानंतर आठ आणि 9 सप्टेंबर रोजी पश्चिम बंगाल, सिक्किम आणि बिहार या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दोन दिवस आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरासह अरुणाचल प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
दरम्यान सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरुपात पावसानं हजेरी लावली आहे. पुढील पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. पुढील 24 तासांमध्ये पालघर, धुळे नंदूरबार आणि नाशिक या जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे रायगड, मुंबई, ठाणे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पाच दिवसानंतर राज्यात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.