IMD Weather Update : देशावर ऑगस्टमध्ये मोठं संकट, आयएमडीच्या नव्या अंदाजामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाची स्थिती कशी असणार याबाबत आता हवामान विभागाचा नवा अंदाज समोर आला आहे. नव्या अंदाजामुळे चिंता वाढण्याची शक्यता आहे.

IMD Weather Update : देशावर ऑगस्टमध्ये मोठं संकट, आयएमडीच्या नव्या अंदाजामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 31, 2025 | 8:48 PM

देशासह राज्यात यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला, यावर्षी आतापर्यंत देशभरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे, मात्र पावसाचं प्रमाण असमान असल्याचं दिसून येत आहे. काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, पूर परिस्थिती निर्माण झाली,तर काही भागांमध्ये अजूनही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला आहे, मात्र अजूनही मराठवाड्यात चांगल्या पावसाची प्रतिक्षा आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजामुळे आता चिंता वाढली आहे.

काय आहे हवामान विभागचा नवा अंदाज

मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये देशभरात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये देशातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असल्याचं भारतीय हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी म्हटलं आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे पूर्वोत्तर भारत, पूर्वोत्तर भारताला लागून असलेली काही राज्य, तसेच मध्य भारतातील काही भागांमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आधीच कमी पाऊस झाला आहे, त्यानंतर पुढील दोन महिने देखील मध्य भारतात कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं आता चिंतेत आणखी भर पडली आहे.

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार 1 जून 31 जुलै म्हणजे आजपर्यंत देशात 474.3 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर 445.8 मिमी एवढा सामान्य पाऊस मानला जातो. म्हणजे यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा आतापर्यंत देशभरात 6 टक्के अधिक पाऊस झाला आहे.हिमाचल प्रदेशसारख्या काही राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान पुढील दोन महिने काही राज्य वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे.परंतु त्यापूर्वी पुढील दोन आठवडे देशभरात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रातही पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. मात्र ही स्थिती दोन आठडे किंवा त्यापेक्षा थोडा अधिक काळ राहू शकते, त्यानंतर पाऊस पुन्हा सामान्य होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अद्यापही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही, त्यातच पावसाचा जोर ओसरल्यास शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.