भारत आणि जर्मनीचा एकमेंकावर विश्वास, पीएम मोदींच्या नेतृत्वात संबंध अधिक मजबूत झाले, ग्लोबल समिटमध्ये फडणवीसांनी काय म्हटलं?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले आहेत, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये मुक्त व्यापार करार होणं खूप गरजेचं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले आहेत, यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, भारत आणि जर्मनी यांचा एकमेंकावर विश्वास आहे. भारत आणि युरोपियन संघामध्ये मुक्त व्यापार करार होणं खूप गरजेचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आणि जर्मनीमधील व्यापार संबंध आणखी मजबूत झाले आहेत, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत, या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जर्मनीमध्ये सुरू असलेल्या न्यूज9 च्या ग्लोबल समिटमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ग्लोबल समिटसाठी टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास आणि संपूर्ण नेटवर्कला शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत आणि जर्मनीमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. जर्मनी भारत आणि महाराष्ट्राचा एक विश्वासू मित्र असल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारत आणि जर्मनीमधील संबंध आणखी मजबूत झाले आहेत. भारत आणि जर्मनीमधील भागीदारीचे महत्त्व अधोरेखीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर्मनी अभियांत्रिकीमध्ये उत्कृष्टता आणि अचूकता आणते तर भारत कौशल्ये, युवा ऊर्जा आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा प्रदान करतो.
जर्मनीकडून भारतात विशेषतः महाराष्ट्रात सुरू असलेल्या गुंतवणुकीचा देखील यावेळी फडणवीस यांनी उल्लेख केला आहे. फोक्सवॅगन, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज सारख्या जर्मन कंपन्यांनी महाराष्ट्राला आपले दुसरे घर बनवले आहेत, आणि या गुंतवणुकीतून रोजगाराची देखील निर्मिती होत आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी जर्मनीमधील गुंतवणूकदारांना आवाहन करताना आमच्या जर्मन मित्रांनो, विकास, नवोपक्रम आणि दीर्घकालीन यशात महाराष्ट्र तुमचा भागीदार आहे. आपण सर्वजण एकत्रितपणे उज्ज्वल आणि सामायिक भविष्याकडे वाटचाल करूया, असंही म्हटलं आहे.
