
राज्यासह देशातील वातावरणात मोठा बदल झाला. नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात जोरदार पाऊस होता. आता कडाक्याचा गारठा पडला आहे. थंडी वाढत आहे. हेच नाही तर थंडीच्या लाटेचा मोठा इशारा नुकताच भारतीय हवामान विभागाने दिला. राज्यात पहाटे थंडी आणि दुपारच्या वेळी उकाडा जाणवत आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 नोव्हेंबर रोजी केरळ आणि माहे येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर देशावर अजूनही पावसाचे ढग कायम आहेत. देशातील काही राज्यांमध्ये 15 नोव्हेंबरपर्यंत थंडीचा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे थंडी तर दुसरीकडे पाऊस पडताना दिसतोय. यंदा ऐन दिवाळीमध्येही मुसळधार पाऊस बघायला मिळाला. पावसासह थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला.
धुळ्याचे नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफामध्येही पारा चांगला घसरला 9 अंशापर्यंत पारा गेला. मालेगाव, परभणी, नाशिक, जेऊर, यवतमाळ आणि गोदिंयामध्ये 11 अंशांच्या खाली पारा गेला असून गारठा वाढला. पहाटे गारठा इतका जास्त वाढत आहे की, दव देखील पडत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढण्याची शक्यता असून तसा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिला.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 नोव्हेंबर रोजी केरळ आणि माहे येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे बहुतेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. 13 नोव्हेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात थंडीपासून तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
13 नोव्हेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेशातील काही भागात थंडी वाढेल. पुढील पाच दिवसांत ईशान्य भारतात हलके ते मध्यम धुके राहण्याची शक्यता आहे. काही राज्यात पाऊस तर काही राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सध्या बघायला मिळत आहे. पुढील काही दिवसांमध्ये संपूर्ण देशात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुण्यातही गारठा वाढला आहे. मुंबईत थंड वाऱ्यासह गारठा जाणू लागला आहे.