सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात उष्णता वाढणार आहे. नागरिकांनी दुपारच्यावेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.

सावधान! या वेळेत घरातबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, आज..
Heat alert
| Updated on: Apr 15, 2026 | 7:16 AM

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. सध्या राज्यात उष्णता वाढल्याचे बघायला मिळत आहे. अकोला येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अकोल्यात 43.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सांगली आणि सोलापूर येथे उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्णता वाढताना दिसत आहे. दुपारी 12 ते 4 दरम्यान शक्यतो नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. यवतमाळ, अमरावती, अकोला, वर्धा, गडचिरोली, परभणी, सोलापूर, जळगाव, वाशिम आणि मालेगाव या जिल्ह्यांमध्ये 42 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. आजही उष्णता वाढणार आहे. शक्यतो दुपारच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. आता राज्याहून अवकाळीचे ढग दूर झाल्याचे बघायला मिळत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात उष्णतेचा पारा चढत असून तापमान थेट 42 अंशांवर पोहोचले आहे. अवघ्या दोन दिवसांत तापमानात 3 अंशांची वाढ झाली आहे. दरवर्षी जिल्ह्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद खामगावात होत असते. उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरची वर्दळ सुद्धा कमी झाली. हवामान तज्ञांनी पुढील काही दिवसांत उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला आहे. उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. सोलापुरात काल 42.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील आठवडाभर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट असणार आहे. तीव्र उन्हामुळे सोलापूर शहरातील रस्ते दुकाने सामसूम पडले आहेत. नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

वाशिम जिल्ह्यात पारा बेचाळीशी पार गेला. काल वाशिममध्ये 42.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वाशिम शहरातील मुख्य चौक असलेल्या पाटणी चौकात नेहमी नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या तापमानाचा फटका येथे बघायला मिळतोय. जळगाव जिल्ह्यासह चाळीसगाव तालुक्यात तापमानात मोठी वाढ होत असून पारा तब्बल 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले असून जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us