ट्रम्प पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू… इराण आणि इस्रायल युद्ध परिस्थितीवर ‘सामना’तून घणाघात
सामना वृत्तपत्राच्या रोखठोकमध्ये इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपाची कठोर निंदा करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या धोरणांवर तीव्र टीका केली असून, गाझातील नरसंहार आणि मुलांच्या हत्या थांबविण्यात त्यांचे अपयश अधोरेखित केले आहे.

इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. रोज दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. आता या हल्ल्यात अमेरिकाही उतरली आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान या अणू उर्जा केंद्रांवर हल्ला केला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तापत्राच्या रोखठोकमधून इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अमेरिकेच्या सहभागावर टीका करण्यात आली आहे. तसेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर तीव्र टीका करण्यात आली आहे.
ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू
गाझामधील नरसंहार आणि लहान मुलांच्या हत्या रोखण्यात ट्रम्प अपयशी ठरले आहेत. उलट ते इराणला धमक्या देत आहेत. एका बाजूला ते गाझामध्ये नरसंहार घडवणाऱ्या इस्रायलला पाठिंबा देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला भारतात नरसंहार घडवणाऱ्या पाकिस्तानी जनरल मुनीरला ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘डिनर’साठी बोलावतात, यावरुन शिवसेना ठाकरे गटाने टीका केली आहे.
प्रे. ट्रम्प व त्यांच्या समर्थक देशांची टोळी जगात अराजक माजवू पाहत आहे. गाझातील नरसंहार इस्रायलने केला. प्रे. ट्रम्प हा नरसंहार, मुलांच्या हत्या थांबवू शकले नाहीत. उलट इराण-इस्रायल युद्धात ते इराणला दम भरत आहेत. भारतात नरसंहार घडवणाऱ्या पाकिस्तानी जनरल मुनीरला मात्र ते ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘डिनर’ला बोलावतात. प्रे. ट्रम्प हे पंतप्रधान मोदींचे मित्र, पण भारताचे शत्रू आहेत, अशा शब्दात सामनातून घणाघात करण्यात आला आहे.
तेलाच्या पैशांमुळे श्रीमंत झालेले देश
किमान ७० टक्के जगाला इस्रायलची ‘गुंडगिरी’ थांबवायला हवी असे वाटते. इस्रायलने गाझामध्ये ६० हजार लोकांना, ज्यात भुकेने व्याकूळ झालेल्या मुलांचा समावेश आहे, ठार केले आहे. जे जे लोक हजारो वर्षे स्वतः अत्याचार सहन करून उभे राहिले, त्यांनीच आता अशा प्रकारचे अत्याचार करणे धक्कादायक आहे. इराणने इस्रायलवर हल्ले केले तेव्हा जगातील अनेक राष्ट्रांनी आनंद व्यक्त केला. कारण इस्रायललाही कोणीतरी ‘गाझा’सारख्या परिस्थितीचा अनुभव देत आहे असे सामनाच्या रोखठोकमध्ये म्हटले आहे.
अमेरिकेचे भक्कम समर्थन असलेल्या इस्रायलला इराणने आपल्या विज्ञानाचा आणि संशोधनाचा वापर करून घाम फोडला. ५७ इस्लामिक देश असूनही तेलाच्या पैशांमुळे श्रीमंत झालेले सौदी-अरब, यूएई, इराक, कुवेत, कतार यांसारखे देश इस्रायलच्या ‘झुंडशाही’चा मुकाबला करू शकत नाहीत. श्रीमंत, पण डरपोक सौदी-अरब, संयुक्त अरब अमिरात, इराक, कुवेत, कतार, दुबई, येमेन हे सर्व तेलाच्या पैशांनी श्रीमंत झालेले देश आहेत, पण इस्रायलच्या झुंडशाहीचा मुकाबला ते करू शकत नाहीत. जगातील सर्वोच्च शोध, संशोधन, विज्ञान, संरक्षण सिद्धता, सावकारी, अमेरिकेचा पाठिंबा इस्रायलच्या बाजूने आहे, असे सामना वृत्तपत्रात नमूद करण्यात आले आहे.
ट्रम्प गाझातला नरसंहार रोखू शकले नाहीत
शिवसेना ठाकरे गटाने अमेरिका, रशियासारख्या देशांवर शस्त्रे आणि लढाऊ विमाने विकण्यासाठी युद्ध भडकावण्याचा आरोप केला आहे. शांतता नांदल्यास या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल, त्यामुळे ते लहान राष्ट्रांना आणि दहशतवादी गटांना झुंजवत असतात. इराण हा भारताचा परंपरागत मित्र असूनही भारताचे परराष्ट्र धोरण याप्रश्नी भरकटले असल्याची खंत ‘सामना’ने व्यक्त केली आहे.
प्रे. ट्रम्प व त्यांच्या समर्थक देशांची टोळी जगात अराजक माजवीत आहेत. पुतीन यांना युक्रेन संपवायचे आहे. ट्रम्प यांना इराणमध्ये सत्तापालट करायचा आहे. जगात शांतता नांदावी असे यापैकी कुणालाच वाटत नाही. तरीही शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी ट्रम्प यांची इच्छा आहे हे आश्चर्य आहे. प्रे. ट्रम्प गाझातला नरसंहार रोखू शकले नाहीत. हा नरसंहार ज्यांनी घडवला त्या इस्रायलच्या मागे ते आज उभे आहेत. कश्मीर खोऱ्यातील पहलगाम येथे 26 निरपराध्यांचे बळी घेणाऱ्या जनरल मुनीरला प्रे. ट्रम्प ‘डिनरला’ बोलावतात आणि आपण शांतिदूत असल्याचा आव आणतात. अशा ट्रम्प यांच्यासाठी मोदी यांनी भारतात प्रचाराचा नारळ फोडला. आता तेच ट्रम्प भारतावर उलटले आहेत, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली.