
इराणवर इस्रायल-अमेरिकेकडून हल्ला चढवण्यात आल्यावर मोठ्या युद्धाला तोंड फुटलं आणि जगाता हाहाकार माजला. 12 दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर, भारतातही दिसत असून महाराष्ट्रालाही या युद्धाची झळ सोसावी लागत आहे. मध्यपूर्वेतून होणारा उर्जा पुरवठा थांबला आहे, एलपीजी गॅस पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झाले. राज्यातील अनेक भागांत गॅसची टंचाई जाणवत आहे. मुंबईस पुमे,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या महानगरांमध्ये नागरिक, हॉटेल व्यावसायिक, मेस चालक अशा अनेकांना मोठा फटका बसला आहे.
युद्धजन्य परिस्थितीमुळे lpg गॅस सिलेंडरच्या वितरणावरती निर्बंध आले असल्याने आता जळाऊ लाकडांना मागणी वाढली आहे. रत्नागिरी शहरातील विविध सॉ मिल मध्ये जळाऊ लाकडांची मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे. सध्या सॉ मिल मधील जळाऊ लाकडांचा दर प्रति किलो चार रुपये इतका आहे तर भुसा तीन रुपये किलो आहे. बेकरी आणि हॉटेल व्यवसायिकांकडून जळाऊ लाकडांची विचारणा होऊ लागली असून त्यामुळे आता जळाऊ लाकडांचा दर वाढण्याची शक्यता
आहे. तसेच सॉ मिल मधल्या जळाऊ लाकडांसाठी काही कंपन्यांनी देखील मागणी केली आहे.
ठाण्यात कोळशाची मागणी
युद्धाचा फटका गॅस सिलेंडरना बसत असतानाच आता अनेकांनी कोळशाकडे धाव घेतली असल्याने कोळशाची मोठी मागणी दिसून येत आहे. सध्या कोळशाचे भाव चाळीस रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात कोळसा विकत घेतला जात आहे. अनेक हॉटेल आणि धाब्यांसाठी कोळशांचा वापर केला जातो, त्यामुळे येणाऱ्या काळात अनेक लोक कोळशाचा पर्याय निवडू लागल्याचे दिसून येईल.
सोलापुरात घरगुती गॅस घेण्यासाठी लोकांच्या रांगा
सोलापुरातील रामवाडी परिसरातील गॅस गोडाऊनवर गॅस घेण्यासाठी लोकांची भली मोठी रांग लागली आहे. इराण-इस्त्राईल युद्धच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची भीती लोकांच्या मनात आहे. यापुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने गॅस आत्ताच घेऊन साठवून ठेवण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपनीच्या ऑनलाईन बुकिंग पद्धतीत तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे नागरिक स्वतःच गॅस घेऊन एजन्सीमध्ये येत आहे.
आम्ही चार दिवसापूर्वी बुकिंग केले होते त्यानंतर आज आमचा नंबर आलाय. काही लोकांना ऑनलाईन बुकिंग नसल्याने घरी पाठवले जात आहे. आम्ही दोन तासांपासून रांगेत थांबलोय अजून नंबर आला नाही, असं काही नागरिकांनी सांगितलं. ऑनलाईन बुकिंग केले तरी ते होत नाही, त्यामुळे आम्ही गॅस टाकी घेऊन इथे आलोय.
मात्र गॅस टाक्या उपलब्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन आम्ही त्यांना करतोय. पण मात्र नागरिक गॅस टाक्या घेऊन थेट ऑफिसमध्ये येत आहेत, असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय.