
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून आता ‘ईश्वरपूर’ असं ठेवण्यात आलं आहे. भारतीय सर्वेक्षण संस्थेनं या प्रस्तावाला मान्यता दिली असून इस्लामपूरचं नाव अधिकृतपणे बदललं आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. छाननी आणि जागेची पडताळणी केल्यानंतर भारतीय सर्वेक्षण संस्थेनं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. इस्लामपूर नगर परिषदेनं 4 जून 2025 रोजी शहराचं नाव ‘ईश्वरपूर’ असं बदलण्याचा ठराव मंजूर केला. तर सांगलीचे वरिष्ठ पोस्ट ऑफिस अधीक्षक आणि मध्य रेल्वेचे मिरजेचे सहाय्यक विभागीय अभियंता यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देणारं ना हरक प्रमाणपत्र (NOC) जारी केलंय.
हा निर्णय सांगली जिल्ह्याच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. हा बदल प्रादेशिक संस्कृतीचा आणि पारंपरिक ओळखीचा आदर करण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल असल्याचं स्थानिकांचं मत आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक सर्वेक्षक तुषार वैश यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला याबाबत पत्र लिहिलं आहे. लवकरच राजपत्र अधिसूचना जारी करण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. तर गृह मंत्रालय, भारतीय सर्वेक्षण महासंचालक कार्यालय, पश्चिम क्षेत्र, जयपूर आणि पुणे संचालनालयालाही माहिती पाठवण्यात आली आहे.
याप्रकरणी मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. ‘महाराष्ट्रातील इस्लामपूर आता ईश्वरपूर झालं आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यास केंद्र सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे आता इस्लामपूर शहर हे ईश्वरपूर म्हणून ओळखलं जाईल. यासाठी स्थानिक पातळीवर व्यापक जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. एक हिंदू म्हणून मीसुद्धा या मोर्चेत सहभागी झालो होतो. त्या मोर्च्यामुळे आज इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्यात आलं आहे. ही सांगली आणि संपूर्ण राज्यातील लोकांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. हा निर्णय केवळ नाव बदलण्यापुरता मर्यादित नाही, तर हिंदू संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आहे’, असं त्यांनी लिहिलंय. या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत.