मी विष प्यायलोय, कारण कुणालाच सांगणार नाही… संस्थाचालकानं विष पिऊन संपवलं जीवन; कुटुंबीय म्हणतात, त्यांचा मृत्यू…
Jalgaon News: जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजकुमार कावडिया यांनी कोणत्या कारणामुळे विष प्राशन केले याचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.

जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जामनेर येथील प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राजकुमार कावडिया यांनी कोणत्या कारणामुळे विष प्राशन केले याचे नेमके कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही. कावडीया यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने जळगाव मधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
जामनेर मधील पळसखेडा बुद्रुक शिवारात प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी काही महिन्यापूर्वीच रद्द करण्यात आली होती. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारती पाडण्याचेही आदेश देण्यात आले होते. संस्थेवर कारवाई होत असताना संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट
राजकुमार कावडीया यांनी विष प्राशन केल्यानंतर विषबाधा झाल्याने उपचारादरम्यान दोन ते अडीच तासानंतर त्यांचा झाला मृत्यू झाला. आता शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचे नेमकं कारण समोर येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. राजकुमार कावडीया यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून विषप्राशन केल्याची चर्चा सुरू आहे, मात्र कुटुंबीय आणि पोलीसांना यावर कोणतेही भाष्य केलेले नाही.
मी विष पिलो, मात्र…
प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी रद्द झाल्याने कावडिया तणावात होते अशी माहिती समोर आली आहे. आज पहाटे साडे सहा वाजेच्या सुमारास राजकुमार कावडीया यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी विष पिलो मात्र कुणाला कारण सांगणार नाही असं कावडिया यांनी म्हटल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
कुटुंबीयांनी काय म्हटलं?
राजकुमार कावडिया यांच्या आत्महत्येबाबत बोलताना कुटुंबीयांनी म्हटले की, गेल्या काही दिवसांपासून ते तणावात होते, त्यातून आज त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र त्यांनी विषप्राशन केली नसल्याची माहिती कावडिया यांचे जावई तन्मय भंडारी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थेचा वाद होता, याच कारणामुळे ते तणावात आणि आर्थिक अडचणीत होते, असंही भंडारी यांनी म्हटले आहे.
