
कायदेशीर घटस्फोट झालेला नसतानाही न्यायालयाची आणि पहिल्या पत्नीची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांच्या आधारे दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जळगावात याप्रकरणी पती, दुसरी पत्नी आणि सासरच्या मंडळींसह ९ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील शिव कॉलनी परिसरात राहणाऱ्या वैशाली चौधरी (३७) यांचा विवाह १८ मे २०१३ रोजी स्वप्नील अरुण चौधरी याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळाने त्यांच्यात कौटुंबिक वाद निर्माण झाले. ज्यामुळे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. सध्या न्यायालयात त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु आहे. हा दावा अद्याप प्रलंबित असून त्यावर कोणताही अंतिम निकाल लागलेला नाही.
मात्र ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच, पती स्वप्नील चौधरी याने आपण घटस्फोटीत असल्याचे भासवणारे बनावट दस्तऐवज (Fake Documents) तयार केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्याने २० मे २०२४ रोजी राजश्री रोहिदास कोळी हिच्याशी दुसरे लग्न उरकून घेतले. या लग्नासाठी त्याने नातेवाईकांनाही सहभागी करून घेतले होते. हा सर्व प्रकार अत्यंत योगायोगाने उघडकीस आला. वैशाली चौधरी या १५ डिसेंबर रोजी त्यांच्या प्रलंबित दाव्याच्या कामासाठी न्यायालयात गेल्या होत्या. तिथे त्यांची ओळख कविता किरण सपकाळे नावाच्या महिलेशी झाली. संभाषणादरम्यान कविता यांनी सांगितले की, त्यांची बहीण राजश्री कोळी हिचा विवाह स्वप्नील चौधरी याच्याशी झाला आहे. हे ऐकून वैशाली यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने या प्रकरणाचा पाठपुरावा करून पोलिसांत धाव घेतली.
वैशाली चौधरी यांच्या तक्रारीवरुन रामानंदनगर पोलिसांनी पतीसह लग्नाला उपस्थित राहून प्रोत्साहन देणाऱ्या खालील ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यात स्वप्नील अरुण चौधरी (पती), राजश्री रोहिदास कोळी (दुसरी पत्नी), कमलबाई चौधरी (पतीची आई), राजेश पंढरीनाथ पाटील (नातेवाईक), मधुकर बळीराम चौधरी (नातेवाईक), विमल चौधरी (नातेवाईक), संदीप चौधरी (नातेवाईक), विद्या संदीप चौधरी (नातेवाईक), अज्ञात पुरोहित (लग्न लावणारे भटजी) अशा एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिल्या जोडीदाराशी कायदेशीर घटस्फोट झालेला नसताना दुसरे लग्न करणे हा गंभीर दखलपात्र गुन्हा आहे. या प्रकरणात केवळ दुसरे लग्नच झाले नाही, तर त्यासाठी न्यायालयाच्या नावाचा वापर करून बनावट कागदपत्रेही तयार करण्यात आली आहेत. यामुळे आरोपींवर फसवणूक आणि बनावटगिरीची कलमे लावण्यात आली आहेत. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांना स्वप्नीलच्या पहिल्या लग्नाची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी या गुन्ह्यात साथ दिली, असा ठपका फिर्यादीत ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करत असून, बनावट कागदपत्रे नेमकी कोठे आणि कशी तयार केली गेली, याचा शोध घेतला जात आहे.